तपोवन - एक स्वर्ग

जून २०१२

गंगोत्री भागातील केदारताल (१५,५०० ft) व रुदुगैरा बेस कॅम्प (१४,५०० ft) हे ट्रेक २००३ साली झाल्या वर मला तपोवन ला जायची खूप इच्छा होती. ती इच्छा जून २०१२ साली पूर्ण झाली. आम्ही गंगोत्री - तपोवन - नंदनवन हा ट्रेक प्लॅन केला.
 
ह्या आधीचे सर्व ट्रेक मामांनी (चंद्रशेखर बापट- माझे फोटोग्राफी व ट्रेकिंग मधले गुरु) घरी शिवलेल्या टेन्ट मध्ये राहून व शिधा, स्लिपींग बॅग असे सर्व सामान आपापले नेऊन केले होते. आता ते टेन्ट खूप जुने झाले होते व काही तर विरले होते त्या मुळे आम्हाला संपूर्ण व्यवस्था उपलब्ध करून देणारा कोणीतरी पाहिजे होता. ट्रेक प्लँनिंग च्या चर्चे मध्ये असे कळले जोशी काकूची एक मैत्रीण व तिचा मुंबई चा ग्रुप तपोवन ट्रेक प्लॅन करत आहेत व उत्तरकाशी मधील राजेश नेगी वर व्यवस्थेची जबाबदारी सोपवली आहे. त्या ५ जणी होत्या. त्यांच्याशी बोलणी करून आमच्या ग्रुपला त्यांना जॉईन केले. राजेश नेगी शी पुढची बोलणी मी करणार असे ठरले. 

तपोवन टीम: पुणे: मी, मामा, श्रीपाद गोखले, विजय वैद्य, मिलिंद वायचळ, ललित देशमुख, माधुरी जोशी, सिद्धार्थ जोशी, ललित देशमुख, नितीन पोरे, एकादशी कोल्हटकर, विश्वास दीक्षित   
मुंबई: जयश्री पंडित, नैना आगरकर, अनिता आगरकर, अरुणा लागू
 

त्या प्रमाणे सर्व ट्रेकचे नियोजन मी राजेश बरोबर आखले. राजेश कडून आम्हाला गाईड, टेन्ट, स्लिपींग बॅग, आणि जेवण हि सेवा मिळणार होती. आमच्या ट्रेक ला गाईड म्हणून राजेश स्वतः आले होते. आमची १६ जणांची टीम १३ जून ला उत्तरकाशी ला पोहोचली. १४ जुन ला राजेश ची टीम व आमची टीम गंगोत्रीला निघाली. वाटेत दोन सुंदर गांव लागतात हर्षील धराली. त्या मधले धराली हे राजेश चे गाव. हे सगळे बघत बघत आम्ही गंगोत्री ला पोहोचलो. गंगोत्री १०,००० फुटांवर आहे. १०,००० फुटांपासून हवा विरळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे श्वसन करायला त्रास होतो व त्याचा परिणाम शरीरावर होतो. यासाठी आम्ही थोडे ट्रेक route वर चढून आलो. ह्याने Acclimatization चांगले होते. त्या नंतर गंगोत्री च्या देवळात गेलो सर्वांचा ट्रेक यशस्वी होऊ दे अशी प्रार्थना केली. हॉटेल वर येऊन दुसऱ्या दिवशीच्या ट्रेक ची तयारी केली आणि तपोवन ची स्वप्नं पहात झोपलो. 


दिवस पहिला: गंगोत्री ते "चिडबासा" ९ किमी जायचे होते. ट्रेक सुरु झाला, एका बाजुला डोंगर तर दुसऱ्या बाजूला अवखळ वाहणारी भागीरथी नदी. थोडे पुढे गेल्या वर भागीरथी शिखरांनी डोकवायला सुरुवात केली. चिडबासा म्हणजे चीड च्या झाडांचे वन, आजचा मुक्काम ११,७५० फुटांवर होता. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तर राजेश ची टीम टेन्ट लावून वेलकम ड्रिंक घेऊन तयार उभी होती. आम्हाला असल्या आदरातिथ्याची सवय नव्हती. ह्या आधीचे सर्व ट्रेक स्वतः टेन्ट लावण्या पासून किचन सेट करणे व चहा करणे आम्हीच करत होतो. आम्ही टेन्ट मध्ये जाऊन आवरा आवर केली आणि जेवण करायला बाहर आलो. बघितले तर छान बुफे मांडला होता. सूप, पोळी-भाजी, डाळ-भात, सलाड आणि शेवटी स्वीट असे जेवण होते. संध्याकाळी मस्त जेवण करून थंडीत झोपताना, गरमा गरम बोर्नव्हिटा पिऊन आजच्या दिवसाला पूर्णविराम मिळाला. इथे मनात म्हणालो ह्या ट्रेक नंतर वजन कमी होणे सोडा पण वाढणार नक्की. राजेश आम्हाला त्याचे अनुभव सांगत होता. त्या मध्ये वेळ कसा गेला कळले नाही. आलो तेव्हा ढगात असलेल्या भागीरथी शिखरांनी संध्याकाळ झाल्या वर ढगातून डोकवायला सुरुवात केली. आकाश एकदम स्वच्छ झाले. संधी प्रकाशात भागीरथी शिखरांनी आपलं सौंदर्य दाखवायला सुरुवात केली. तडक कॅमेरा घेऊन कॅम्प साईट पासून दूर भागीरथी नदी पाशी गेलो. किती फोटो काढू असे झाले होते. पुढे काय काय बघायला व फोटोग्राफी ला मिळणार ह्याची ही एक झलकच होती. आता आस लागली होती पुढील कॅम्प ची, "भोजबासा".


दिवस दुसरा:
 आजचा ट्रेक जास्त नव्हता ५किमी जायचे होते. पहाटे लवकर उठून चहा नाश्ता घेऊन तडक चालायला सुरुवात केली. मुख्य ट्रेक रूट पासून कॅम्प साईट जरा १५० फूट खाली उतरून होती. सगळयांनी परत ट्रेक रूट वर येण्यासाठी ची पायवाट चढायला सुरुवात केली. मी, मामा आणि राजेश सर्वात मागे होतो. निवांत फोटो काढत जायचे असा प्लॅन होता. टीमला इथे पहिला धक्का बसला. आमचा मित्र मिलींद ते छोटेसे चढण चढताना धापा टाकायला लागला, १५० फूट चढताना सुद्धा त्याला १० वेळा थांबावे लागत होते. मी, मामा आणि राजेश नी चर्चा करून मिलिंदला परत खाली गंगोत्री पाठवण्याचा निर्णय घेतला व त्याने तो मान्य केला. बाकी टीम पुढे गेली होती. राजेश चा एक माणूस आणि मिलिंद ह्यांनी गंगोत्री ला उतरायला सुरुवात केली, तो पर्यंत मी आणि राजेश तिथेच थांबलो होतो. ते निघाल्या वर मग आम्ही दोघांनी पुढे चालायला सुरुवात केली. मी आणि राजेश मस्त गप्पा मारत चालत होतो तेव्हड्यात हिमालयातील अत्यंत लाजाळू प्राणी mountain weasel आमच्या समोर पायवाटेवर आला. मी तात्काळ त्याचे फोटो काढायला सुरुवात केली, एकामिनीटा पेक्षा हि कमी वेळ तो आमच्या समोर असेल. त्या वेळात १०-१२ क्लिक मिळाले, ह्या पेक्षा फोटोग्राफी साठी चांगली सुरुवात काय असणार..!

mountain weasel

भरल (ब्लु शिप)

पुढे एक पूर्ण स्क्रि(भुसभुशीत उतार) असलेला पट्टा होता. त्या मध्ये अजिबात थांबून चालणार नव्हते कारण वरून भरल (ब्लु शिप) चालत होते. त्यांच्या पायाने छोटे-मोठे दगड सुटत होते ते ट्रेकर्स ना लागण्याची शक्यता होती. त्या मध्ये आम्हाला काळजी आमच्या कॅमेरा ची..! त्याला काही झाले तर ट्रेक होईल पण फोटोग्राफी बोंबलेल. तो पट्टा सहीसलामत क्रॉस करून पुढे गेलो. काही वेळात भूर्जपात्राची झाडे दिसू लागली. त्याच जवळ आमचा आजचा मुक्काम होता भोजबासा उंची १२,८०० फूट. भागीरथी शिखरं अजून जवळ दिसत होती. थोडे फार भागीरथी ग्लेशियर पण दिसायला लागले. थोडा आराम करून आम्ही सनसेट फोटोग्राफी साठी परत भागीरथी नदीच्या च्या किनाऱ्यावर गेलो. भागीरथी शिखरांवर आज खूपच ढग होते. भागीरथी नदी व सूर्यास्त आणि ढगांना आलेली सुंदर सोनेरी किनार असे मनोहारी दृश्य आम्ही फोटोत टिपले. थंडी चांगलीच वाढली होती म्हणून टेन्ट मध्ये परतलो. आता उद्याचा दिवस होता तपोभूमी असलेल्या "तपोवन"चा.


दिवस तिसरा: स्वच्छ निळ्या आकाशात दिमाखात उभ्या असलेल्या उत्तुंग भागीरथी ला बघून दिवसाची सुरुवात होणे यापेक्षा सुंदर काय असू शकते..! मस्त चहा आणि नाश्ता घेऊन भोजबासा वरून आम्ही पुढील वाटचालीस सुरुवात केली. गोमुख १३,२०० फूट आणि गोमुख वरून भागीरथी ग्लेशिअर क्रॉस केली की तपोवन १४,५०० फूट असा आमचा आजचा ट्रेक होता. जसे जसे आम्ही गोमुख च्या जवळ आलो तसे शिवलिंग शिखराने डोकवायला सुरुवात केली. गोमुख ला पोहोचलो आणि टीम ला अजून एक धक्का बसला. जोशी काकू खूप स्लो चालत होत्या व त्यांना बऱ्या पैकी दम पण लागत होता. मी मामा, आणि राजेशनी ठरवले त्यांना तिथून परत गंगोत्रीला पाठवू पण काकूंना व त्यांचा मुलगा सिद्धार्थला तपोवनला जायची ओढ शांत बसू देत नव्हती. त्या मुळे त्यांनी पुढे यायचा हट्ट धरला. तिथे जास्त वेळ थांबून चालणार नव्हते कारण ग्लेशिअर क्रॉस केल्यावर जी चढण आहे त्या मध्ये तपोवन वरून येणारी आकाश गंगा क्रॉस करायची होती उन्हामुळे बर्फ वितळून त्या नदी चे पाणी वाढते त्याच्या आत आम्हाला ती नदी क्रॉस करावी लागणार होती. पण काकूंना समजावण्यात आमचा वेळ गेला व आम्हाला उशीर झालाच. त्या नंतर सर्व टीमनी भागीरथी ग्लेशिअर ओलांडायला सुरुवात केली. आमचे कॅमेरा किटआम्ही पॅक करून आत ठेवलं. भागीरथी ग्लेशिअर हे भारतातील सगळ्यात मोठे ग्लेशियर (गोठलेली हिमनदी), अत्यंत भयावह असे ते ग्लेशिअर व मोठमोठ्या क्रिव्हायसेस बघून पोटात गोळा येणे पण बंद झाले होते, पावलागणिक रिस्क होती. सगळ्यांनी सुखरूप ग्लेशिअर ओलांडले. (श्रीपाद काकांनी हळूच त्यांच्या छोट्या कॅमेरा तुन टिपलेला क्रिव्हायस चा फोटो)

क्रिव्हायसेस

आकाश गंगा ओलांडताना

शेवटचे मोरेन चढायला सुरुवात केली, आकाश गंगेचे पाणी वाढले होतेच. आम्ही आमचे शूज काढून बर्फ़ापेक्षा थंड असलेल्या पाण्यातून नदी क्रॉस केली. पुढील चढण खूपच खडे होते, १०-१० पावलावर धाप लागत होती. कधी एकदा हे चढण संपत आहे असे झाले होते. अचानक शिवलिंग शिखराचा टॉप दिसायला लागला व पावला गणिक पूर्ण शिखर दिसायला लागले. डावीकडे भागीरथी शिखर व ग्लेशियर, तपोवन पठार व उजवी कडे शिवलिंग व मेरू शिखर असे नयनरम्य दृश्य बघत कधी तपोवन वर पोहोचलो कळले नाही. कॅम्प साईट वर पोहोचलो थोड्यावेळ बाहेरच बसून तपोवन चा आनंद घेतला. संध्याकाळी आकाश गंगे मध्ये भागीरथी शिखराचें प्रतिबिंब फोटो मध्ये टिपायचा प्रयत्न केला.


असे वाटत होते कायमचे इथेच राहावे. मुंबई ग्रुप व जोशी काकू ह्यांच्या टेन्ट मध्ये चर्चा सुरु झाली पुढे नंदनवन ला जायला नको, खूप रिस्क आहे वगैरे वगैरे... तसे हि जोशी काकूंची तब्येत काही बरोबर वाटत नव्हती. मी मामा आणि राजेश नी बोलून नंदनवन ला जायचे कि नाही ह्या वर उपाय काढायचा प्रयत्न केला. आम्हाला नंदनवन ला जायची खूप इछा होती मामांचा तर तपोवन ट्रेक चार वेळा झाला होता, केवळ नंदनवन साठी ते ह्या ट्रेक ला यायला तयार झाले होते. दोन टीम करता येणे शक्य नव्हते तेवढी माणसे नाहीत व साधन-सामग्री पण नव्हती. मग काय दोन रात्र मुक्कम तपोवनलाच करायचे आणि मग खाली उतरायचे असे ठरले. दुसऱ्या दिवशी "खडापत्थर" ला जायचे होते. 

दिवस चौथा: तपोवन ला शिवलिंग शिखराचा बेस कॅम्प म्हणतात. आल्या पासून तेच शिखर पूर्ण क्लिअर बघायला मिळाले नाही. पहाटे उठलो तरी ढग होतेच. चहा आणि नाश्ता घेऊन खडापत्थरला जायला निघालो. आमच्या कॅम्प साईट पासून साधारण 4 km चा ट्रेक होता. कॅमेरा किट, पोंचो, थोडा सुकामेवा असे घेऊन निघालो. जसे जसे खडा पत्थर जवळ येत होते भागीरथी ग्लेशियर आणि शिखरं दोन्ही अजून जवळ येत गेली. इकडे शिवलिंग शिखर त्याच्या बेबी शिवलिंग सोबत हळू हळू दिसू लागले. ढग कमी होऊन फोटोग्राफीसाठी चांगले वातावरण झाले. वाटेत पक्षी, प्राणी व बर्फाच्छादित शिखरांचे फोटो काढत निवांत चालत होतो. तेवढ्यात भरल (ब्लू शीप) चा एक कळप चरताना दिसला व त्या मागे भव्य भागीरथी शिखर, खूपच सुंदर नजारा होता.


कधी कधी वाटते हे हिमालयातील पक्षी आणि प्राणी किती नशीबवान आहेत स्वर्गातच राहायला मिळते ह्यांना. खडापत्थरला पोहीचलो तिथून खर्चेकुंड शिखर अतिशय सुंदर दिसत होते, आम्ही थोडे भागीरथी ग्लेशिअर मध्ये उतरायचा प्रयत्न केला पण दरड कोसळली होती व त्यात पायवाट वाहून गेली होती. म्हणून तिथेच फोटो काढले व परतीच्या प्रवासाला सुरुवात ली. ढग परत जमा झाले होतेच, बारीक पाऊस पण पडायला लागला.पळत पळतच कॅम्प साईट वर पोहोचलो, आम्ही भिजलो तर चालेल हो..! पण काळजी होती ती "कॅमेरा कीटची".

दिवस पाचवा: एक अविस्मरणीय सकाळ..! एकदम स्वच्छ आकाश, शिवलिंग शिखरावर सूर्याचे पाहिले किरण पडल्याने शिखर सोन्या सारखे झळाळून उठले आणि मागे असलेले मेरू शिखर पण अग्नीच्या ज्वालांसारखे भासत होते. मी आधी कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. कुठून कसे वेगवेगळे compose करता येतील बघत होतो. माझी ही सगळी गडबड बघून राजेश म्हणाला चल मी तुला एका जागी घेऊन जातो फोटो काढायला. मी खुश होऊन एका पायावर तयार. चहा आणि नाश्ता झाल्यावर आम्ही दोघे निघालो. मामा,श्रीपाद काका व ललित बघत होते आम्ही कुठे जात आहोत ते पण मागे मागे आलेच, एक मोरेन चढलो गाईड म्हणाला इथून पुढे नीला ताल साठी जातात. वर पोहोचल्यावरचा नजारा पाहता असे वाटले की आता मी शिवलिंग व मेरू शिखरांना मिठीच मारणार. इकडे बलाढ्य भागीरथी शिखर व ग्लेशियर दोन्ही अजून छान दिसायला लागले होते. किती फोटो काढू किती नाही असे झाले. सर्वांनी एकत्र त्या जागे वरून एकत्र फोटो काढला व उतरायला सुरुवात केली.


ह्या फोटो मध्ये डावी कडून भागीरथी शिखर व ग्लेशियर, तपोवन पठार, शिवलिंग शिखर, थोडे खर्चेकुंड शिखर व आकाश गंगेच्या शेजारी आमचे टेंट दिसत आहेत, आशा या बलाढ्य हिमालायला समोर माणूस क्षुद्रच म्हणावा लागेल..! मोरेन वरून खाली आलो तेव्हा कळले कि जोशी काकूंची तब्येत अजून काही ठीक नाही. काय करता येईल असे मी मामा व राजेश ठरवत होतो त्या मध्ये राजेशनी सुचवले त्यांना झोळी करून नेऊया व गोमुख पासून घोड्यावरून नेऊन आजच गंगोत्री ला पाठवूया. त्याच्या दोन माणसांना एक झोळी बनवली व काकूंना त्या झोळी घालून ते निघाले. 
आज खाली जायची मनातून अजिबात इच्छा नव्हती, पुन्हा एकदा तो पूर्ण परिसर डोळ्यात साठवून आणि सर्व शिखरांना नमन करून तपोवन उतार झालो. परत ती प्रचंड क्रिव्हायसेस ने भेरलेले भागीरथी ग्लेशियर क्रॉस केले, गोमुख ला पोहोचलो. काकू व घोडा तयार होतेच, आम्हाला भेटून ते गंगोत्री साठी निघाले सिद्धार्थ पण त्याच्या बरोबर पण गेला बाकी आम्ही सर्वजण भोजबासा ला येऊन थांबलो.

दिवस सहावा व सातवा: सकाळी नाष्ट्या ला सगळ्यानची चर्चा चालू होती आज आपण पण गंगोत्रीला जाऊ तसाहि ट्रेक संपला आहे. आमच्या म्हणजे पुण्याच्या ग्रुप ला जायची अजिबात इच्छा नव्हती करण आम्ही ऑलरेडी नंदनवन कॅन्सल केले होते, त्यातून राजेश म्हणाला होता मी पैसे पूर्ण घेणार कारण त्याने तसे सामान भरले होते व पोर्टर पण त्या बोली वर आणले होते. गंगोत्री ला आजच गेलो तर खूप सामान वाया जाणार होते. सर्वांशी बोलून आम्ही चीडबासाला जायचे ठरवले व सातव्या दिवशी सगळे जण मस्त गंगोत्रीला आलो. 
जोशी काकू भेटल्या एकदम छान दिसत होत्या. त्यांना भेटल्या वर छान वाटले. मिलिंद ला डॉक्टरनी उत्तरकाशीला जायला सांगितले होते, तो आम्हाला दुसऱ्या दिवशी उत्तरकाशीला भेटला. त्याची तब्येत पण छान झाली होती. सर्वांनी उत्तरकाशीच्या विषवेश्वराच्या देवळात ट्रेक यशस्वी झाल्या बद्दल आभार मानले व परतीचा प्रवास सुरु केला.

टीम तपोवन

तपोवन वरून एकूण 11 शिखरं दिसतात 1. भागीरथी, 2. शिवलिंग, 3. मेरू, 4.सुदर्शन, 5. कोटेश्वर, 6. श्री कैलास, 7. वासुकी, 8. मंदा 9. चतुरंगी, 10. खर्चेकुंड, 11.केदारडोम ह्या पैकी प्रत्येक शिखरं तपोवन च्या वेगवेगळ्या भागातून दिसतात. फोटोग्राफी साठी हा ट्रेक एक वरदान आहे. कितीही वेळा येथे येऊन फोटोग्राफी केली तरी काही तरी नवीन मिळेल हे नक्की.

24 comments:

  1. Chhan,could imagine the scenery. Keep sharing your experiences in Himalayas.

    ReplyDelete
  2. खूप सुरेख!
    मला जायला नक्की आवडेल. हिमालय एक झपाटून टाकणारा विषय आहे. नंदांवनही आणि आव्हानही देणारा!
    लिहीत राहा!

    ReplyDelete
  3. आमोद छान लिखाण... अगदी सविस्तर लिहिले आहेस. फोटो पण अप्रतिम. नंदनवन ट्रेक परत कधी केलात??

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नितीन..! नंदनवन अजून नाही केला करायचा आहे.

      Delete
  4. Khup sundar varnan kelayas Amod... saad ghalatoy nandanvan parat...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks..! Ho aata kadhi jayla milanar ahe baghu..!

      Delete
  5. सुरेख लिखाण आणि photography...

    ReplyDelete
  6. खूप छान अमोद , ब्लॉग वाचताना आणि टप्प्या टप्प्या वर फोटो पाहताना अस वाटत होत
    जी मी स्वतः त्या जागी आहे आणि सर्व माझ्या आजू बाजूला आहे. पहिल्यांदा मी
    मोबाइल वरच वाचला पण नंतर काय झाले माहित नाही मी माझा मोबाइल ५५ इंची टिवी
    जोडला पूर्ण लाइट ऑफ केली आणि पुन्हा पहिल्या पासून वाचला. अप्रतिम !!! शब्द
    नाही मित्रा घरी बसल्या बसल्या स्वर्ग दाखवलास तू मित्रा.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sachin..! aata mazya barobar yeun khara khura bagh Himalay..!

      Delete
  7. छान अमोद! Let's plan together...
    Photos are too good.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Dheeraj Yes sure we will go together..!

      Delete
  8. आमोद,खुप सजीव लिखाण आहे आणि सुरेख फोटोंची जोड आहे. संपुर्ण अनुभव केवळ अवर्णनीय !!Thank for a virtual himalayan ride from all the readers.

    ReplyDelete
  9. तुझ्या सुंदर फोटों मुळे सर्व आठवणी पुन्हा जाग्या झाल्या..खुप खुप धन्यवाद..असेच लिहित रहा..

    ReplyDelete
  10. मस्तच आमोद ... आणि आकाश गंगेतलं भागीरथी शिखराचं प्रतिबिंब फारच सुंदर!

    ReplyDelete
  11. अप्रतीम वर्णन व फोटो. या ट्रेकर्सचा हेवा वाटला.दहा हजार फूटाच्यावर जाताना काय त्रास होतो तो आम्ही व्ह्याली ऑफ फ्लावरला अनुभवले होते. पण तो ट्रेक सोपा होता. ट्रेकर्सचे अभिनंदन.

    ReplyDelete