ऑक्टोबर २००८
प्रत्येक गिर्यारोहकाच्या स्वप्नातील ट्रेक म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प.
| एव्हरेस्ट शिखर (उंची २९,०२८ फूट) - काला पत्थर वरून काढलेला फोटो |
ऑगस्ट मध्ये कधीतरी मला मामांचा फोन आला, "ऑक्टोबर मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प ला येणार का?" ऐकून तरी लगेच हो म्हणावेसे वाटले होते. पण आत्ताच एप्रिल मध्ये अन्नपूर्णा बेस कॅम्प झाला होता. त्यामुळे सुट्टी मिळेल की नाही शंका होती. घाबरत घाबरतच ऑफिस मध्ये विचारले आणि सुट्टी मिळाली. मग काय लगेच तयारीला लागलो. रोज मामां बरोबर टेकडी सुरूच होती. शनिवारी सिंहगड पण सुरु केला. ट्रेक चे नियोजन अरुण परांजपे (अमेरिका) ह्यांनी केले होते. ते अमेरिके मधील NRI लोकांना घेऊन जाणार होते. त्या मध्ये आम्ही पण त्यांना जॉईन झालो. पुणे ते पुणे २६ दिवसांचा प्लॅन होता. मामा आणि मी, अरुण मामा च्या ग्रुप ला काठमांडू मध्ये जॉईन होणार होतो.
एप्रिल २००८ मध्ये अन्नपूर्णा बेस कॅम्प झाल्यावर, मला परत ह्याच वर्षात ट्रेकला जायला मिळेल हा विचार मी स्वप्नात ही केला नव्हता!
टीम एवरेस्ट बेस कॅम्प: अमेरिके वरून: अरुण परांजपे, मेधा गुप्ता, वेंकट सुब्रह्मनियम, मोहित थ्रीखा, राज थ्रीखा, सुषमा बाना, निलाद्री रॉय, रोहन अर्रहाना,
पुण्यावरून: चंद्रशेखर बापट, रेवती ओक (अरुण मामाची भाच्ची) आणि मी.
ट्रेक रूट: काठमांडू - (विमानाने) लूक्ला - मोंजो - फुंकीतेंगा - शोमारे - दिंगबोचे - लोबुचे - गोरखशेप - काला पत्थर / EBC - गोरखशेप - लोबुचे - पँगबोचे - ज़ोरसाले - लूक्ला - (विमानाने) काठमांडू
२ ते ५ ऑक्टोबर: मी आणि मामा पुण्यातून पुणे - गोरखपूर एक्सप्रेस ने निघालो, ४ ऑक्टोबर पहाटे गोरखपूर ला पोहोचलो. स्टेशन बाहेर आलो व जीपने भारत - नेपाळ सीमा लगत चे गाव- सोनौली इथे जायला निघालो. साधारण २ तासत सोनौली ला पोहोचलो. तिथून भारत - नेपाळ सीमा ओलांडून, नेपाळ मधल्या भैरहवा गावात पोहोचलो. तिथून जीप ने काठमांडू चा प्रवास सुरु झाला, पण संध्याकाळी साधारण काठमांडू पासून १० किमी अलीकडे ट्रॅफिक जॅम लागला होता. पुढे कुठे तरी खुप मोठा अपघात झाला होता. पहाटे पर्यंत हा ट्रॅफिक सुरळीत होइल असे सांगत होते. आम्ही तिथेच एका ढाब्या वर जेवण केले व गाडीत झोपलो. ५ ऑक्टोबर ला पहाटे काठमांडू मध्ये पोहोचलो. हॉटेल मध्ये चेक इन करून जरा वेळ आराम केला. संध्याकाळी पशुपतीनाथाच्या मंदिरात गेलो. पण मंदिर बंद होते.
६ व ७ ऑक्टोबर: सकाळी लवकरच पशुपतीनाथाचे दर्शन घेतले व आजूबाजूच्या परिसरातील फोटोग्राफी केली. तिकडून परत हॉटेल वर आलो. संध्याकाळी अरुण मामा, रेवती, मो, राज, निलाद्री, सुषमा, मेधा आले. ह्या अमेरिके वरून आलेल्या टीमचे Welcome पौष्टिक लाडूनी केले.
७ तारखेला सकाळी परत सगळ्यां बरोबर पशुपतीनाथाचे दर्शन घेतले. तिकडून सगळे बौद्धनाथचा स्तूप बघून, तिथूनच विमानतळावर रोहन आणि वेंकटला घ्यायला गेलो.
सर्वांन बरोबर आम्ही प्राचीन गाव पाटण (ललितपूर) बघितले. तिथे भरपूर फोटोग्राफी केली. तिकडून हॉटेल वर आलो. संध्याकाळी आम्हाला 'कुल बहादूर गुरांग' भेटले. ह्यांच्या संस्थेला आम्ही ट्रेक चे व्यवस्थापन दिले होते. त्यांच्या बरोबर गाईड 'लाल' व 'राजू' हे दोघे पण आले होते. दुसऱ्या दिवशी लवकर निघायचे होते. कारण लुक्ला ला पोहोचायला First Flight मिळणे गरजेचे होते.
८, ९, १० ऑक्टोबर: आम्ही पहाटे लवकर उठून काठमांडू विमानतळावर गेलो. आमचे ८.३० चे अग्नी एअर चे विमान होते. चेक-इन झाले. वेटिंग रूम मध्ये बसलो होतो. तेव्हा अनाउन्समेंट झाली. लूक्ला विमानतळावर आधीचे विमान क्रॅश झाले होते. आता कुठले हि विमान उडणार नाही. आम्ही सगळे शॉक झालो आणि एकमेकांचे चेहरे बघत बसलो. ज्या गाडी ने विमानतळावर आलो होतो त्याच गाडीने भक्तपूर गाव बघायला गेलो. प्राचीन मंदिरे व मंदिरांचे समूह ह्या गावात आहेत, अतिशय सुंदर मूर्ती, देवळे बघत त्यांची फोटोग्राफी करत होतो. त्या दिवशी खंडेनवमी (आयुध पूजा दिवस) होती. खूप मंदिरांपुढे बळी दिले जात होते. मला काही ते सर्व पटत नव्हते. आम्ही तिकडून हॉटेल वर आलो आणि दुसऱ्या दिवशी तरी विमान उडेल ह्या आशेने झोपलो.
९ आणि १० दोन्ही दिवस हवा खूप खराब असल्यामुळे, एकही विमान उडाले नाही.आम्हाला दोन्ही दिवस विमानतळावर जाऊन ३ ते ४ तास थांबून परत यावे लागले. १० तारखेला तर विमान उडण्याची दाट शक्यता असल्यामुळे, आम्ही विमानाच्या शेजारी जाऊन थांबलो होतो. पण शेवटी नाहीच जाता आले. लूक्ला विमानतळ एका दरी मध्ये डोंगर खोदून बांधले आहे त्यामुळे रन-वे १ किमी चा पण नसेल. जर हवा चांगली असेल तरच विमाने उतरू शकतात.
EBC ट्रेक व्यवस्थित acclimatization करून करायचा असेल तर १४ दिवस लागतात. आम्ही त्या प्रमाणेच निघालो होतो पण आता आमचे ३ दिवस वाया गेले होते. उद्या विमान उडाले तर आमच्या कडे ट्रेक पूर्ण करण्यासाठी ११ दिवस होते.
११ ऑक्टोबर: आज हवा एकदम स्वछ होती. आम्हाला अग्नी एअर चे ८.३० चे विमान मिळाले. काठमांडू वरून विमान उडाले खरे पण माझ्या मनात एकच धाकधूक होती विमान व्यवथित उतरेल की नाही. हे एक छोटेसे १६ सीटर विमान होते. वाटेत आम्हाला सुंदर हिमालयन शिखरे दिसत होती, त्या मधले गौरी-शंकर शिखर आमच्या एअर होस्टेस सुचेताने आम्हाला दाखवले. लूक्ला जवळ आल्यावर विमानातूनच एअर स्ट्रीप दिसली आणि छातीतील धडधड अजून वाढली, पण आमचे विमान व्यवस्थित उतरले.
लूक्ला एअरपोर्ट उंची १०,००० फूट. उतरल्यावर लगेच हवेतील गारवा जाणवायला लागला. आम्ही पॅराडाइज हॉटेल मध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या व निघायची तयारी केली. तिथेच आम्हाला पुण्यातील डॉक्टर रघूनाथ गोडबोले भेटले. ते ह्या ट्रेक रूट वर बरेच फिरले होते. तेव्हा ते गोकीयो ट्रेक ला निघाले होते. आम्ही त्यांना आमचे ३ दिवस कसे वाया गेले आणि आता आमच्या कडे असलेल्या ११ दिवसात हा ट्रेक कसा करता येईल हे विचारले. त्यांनी लुक्ला ते लुक्ला ९ दिवसाचा प्लॅन आखून दिला. कारण परत जाताना सुद्धा हवा खराब झाली आणि विमान नाही उडाले तर काही दिवस राखीव असावेत. खूपच साहसी व धाडसी प्लॅन होता. रेस्ट साठी एकही दिवस नव्हता.
सर्वांनी "गणपती बाप्पा मोरया" म्हणून चालायला सुरुवात केली. सुरुवातीलाच उतार होता, वाट दूधकोशी नदीच्या कडेनी होती. वाटेत नदी, बर्फाच्छादित डोंगर, दिसत होते. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी लोखंडी पूल खूपच होते, फोटोग्राफी करत चालत होतो.
थाडाकोशी मध्ये जेवलो आणि प्लॅन प्रमाणे संध्याकाळ पर्यंत मोंजो ला पोहोचलो. आमच्या टी हाऊस चे नाव नमस्ते लॉज होते. आज आम्ही १०,००० फुटांवरून सुरु करून ९,३०० फुटांवर राहत होतो. आज आम्ही ९ किमी चाललो, त्या मध्ये ७०० फूट उतरलो होतो. पहिल्याच दिवशी चांगली प्रॅक्टिस झाली होती.
थाडाकोशी मध्ये जेवलो आणि प्लॅन प्रमाणे संध्याकाळ पर्यंत मोंजो ला पोहोचलो. आमच्या टी हाऊस चे नाव नमस्ते लॉज होते. आज आम्ही १०,००० फुटांवरून सुरु करून ९,३०० फुटांवर राहत होतो. आज आम्ही ९ किमी चाललो, त्या मध्ये ७०० फूट उतरलो होतो. पहिल्याच दिवशी चांगली प्रॅक्टिस झाली होती.
१२ ऑक्टोबर: सकाळी नाश्ता करून ७.३० वाजता चालायला सुरुवात केली. आमचा पहिला थांबा होता सागरमाथा नॅशनल पार्क ऑफिस (Check Post). चेकपोस्ट ला प्रत्येकाने हजेरी लावून पुढे जायचे असते, एव्हरेस्ट ची ख्याती संपूर्ण जगात असल्यामुळे वाटेवर बरेच काही माहिती स्वरूपात लिहून ठेवले आहे. तिथे सुद्धा एव्हरेस्ट बद्दल खूप माहिती लिहिली होती.

सागरमाथा नॅशनल पार्क ऑफिस व ट्रेक साठीचा परवाना
त्या नंतर जो उतार सुरु झाला तो संपायचे नाव घेत नव्हता. गोकेकोशी व दूधकोशी ह्या नद्याच्या संगमापाशी तो उतार संपला व नामचे बाजारचा चढ सुरु झाला. मधेच एका जागेवरून एव्हरेस्ट शिखराने पहिले दर्शन दिले. त्याच्या थोडे पुढे कुसुम कंगारू शिखर दिसले. अत्यंत सुंदर शिखर, ते बघून आमच्या मध्ये चढण्यासाठी अजून ताकद आली. नामचे बाजारचा चढ संपता संपत नव्हता. शेवटी एका वळणावर पुढे गेलो आणि डोंगरभर पसरलेले नामचे बाजार गाव दिसले. उंची ११,००० फुट, आम्ही बुद्धा हॉटेल मध्ये जेवण केले व पुढचा प्रवास सुरु केला. परत उतार सुरु झाला. त्याच वाटेवर गोकीयो लेकला व EBC साठी जायचे रस्ते वेगळे झाले. तिथून आम्ही संध्याकाळी फुंकीतेंगाला पोहोचलो उंची होती १०,८६० फूट. आजच दिवस फारच थकवणारा होता.१३ ऑक्टोबर: दिवसाची सुरुवातच २,००० फूट थेंगबोचे च्या चढाने झाली. हा चढ चढताना जी काय दमछाक झाली होती ती आठवले तरी अंगावर काटा येतो, असे कठीण चढ आले की मी श्वासाच्या लयीत चाललो होतो त्यामुळे ते चढण चढायला सोपे गेले. त्यावर थामसेरकु शिखर पूर्ण पायवाट दिसत राहते त्याचे फोटो काढत कधी वर आलो कळले नाही. वर पोहोचल्या वर एक कमान आली "Welcome to Thengboche" इथे खुम्बू भागातील सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे, उंची १२,८०० फूट. आम्ही पोहोचलो तेव्हा खूप छान हवा होती. मॉनेस्ट्री मध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो व फोटोग्राफी ला सुरुवात केली. आता एव्हरेस्ट, नूप्से, ल्होत्से शिखर छान दिसायला लागले होते. उजव्या बाजूला खूपच सुंदर असे अमादबलम शिखर खडे होते.
| थेंगबोचे मॉनेस्ट्री |
| एव्हरेस्ट व नूप्से शिखरं थेंगबोचे वरून |
फोटोग्राफी झाल्यावर आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. पुढे पँगबोचे ला जायला उतार होता. आत्ताची वाट पूर्ण रोडोडेंड्रोनच्या फुलझाडांनी भरलेली होती पण त्याला जास्त फुले नव्हती. आम्ही पँगबोचे गावात जेवण केले आणि पुढे शोमारे साठी निघालो. संध्याकाळी शोमारेला पोहोचलो, उंची होती १३,२०० फूट. तिथून अमादबलम शिखर खूपच सुंदर दिसत होते. रात्री जेवण झाल्यावर आमच्या राजू गाईड ने नेपाळी गाणी गायली. प्रचंड थंडी होती, त्यामध्ये लेमन टी आणि नेपाळी गाणी वाह! काय रात्र होती! पहाटे ४.०० वाजता अरुण मामा ने उठवले, पौर्णिमेची रात्र होती आणि चंद्राच्या प्रकशात अमादबलम शिखर हिऱ्यासारखे चमकत होते. फोटोग्राफी साठी खूपच कमी प्रकाश होता तरीही मी फोटो काढायचा प्रयत्न केला.
![]() |
| अमादबलम शिखर पहाटे ४.३० वाजता काढलेला फोटो |
१४ ऑक्टोबर: पहाटे ५.३० वाजता कोवळ्या सूर्यप्रकाशात कुंगते शिखर सोन्यासारखे चमकत होते. फोटोग्राफी आणि ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही दिंगबोचे साठी निघालो. आज फक्त ६ किमी चालायचे होते. चांगलेच अल्टीट्युड जाणवायला लागले होते. तेवढाच निसर्ग सुद्धा खुलला होता. चालताना आमच्या बरोबर अमादबलम, आयलंड, कुंगते आणि फोकशरमा अशी अनेक शिखरे होतीच. फोटोग्राफी करत करत कधी दिंगबोचे आले कळले नाही. मला दिंगबोचे गाव खूपच आवडले. आयलंड शिखर व अमादबलम शिखर तिकडून फारच सुंदर दिसत होते. आज आम्ही जास्त चढलो नव्हतो १,३०० फूट चढून दिंगबोचे गावात पोहोचलो उंची होती १४,५०० फूट. दिवस खूपच छान होता, स्वछ हवा असल्याने सर्व शिखरं खूपच सुंदर दिसत होती. बर्फासारख्या थंड पाण्यात आमच्या मधल्या काही जणांनी कपडे धुतले. मी त्या हॉटेल मध्ये ३०० नेपाळी रुपये देऊन माझा कॅमेरा रिचार्ज केला. संध्याकाळी जेवण झाल्या वर अरुण मामा ने "ना तुम हमें जानो" गाणे गायले. खरंच गाण्याच्या बोला प्रमाणे समिट झाल्यावर "मेरा हमदम मिल गया" हि भावना येणार होती. मी पण "एहेसान तेरा होगा मुझ पर" गाणे गायले. मस्त मैफल रंगली होती. ती रात्र फारच छान होती.
१५ ऑक्टोबर: पहाटे आयलंड शिखर सोनेरी किरणांनी झगमगले आणि दिवसाची सुंदर सुरुवात झाली. फोटोग्राफी करून आम्ही चालायला सुरु केले. आजची सुरुवात चढाने होती. दिंगबोचे व फेरीचे ह्या दोन गावामध्ये एक खूप मोठे मोरेन आहे.
दोनतास चढून गेल्यावर आम्हाला खूपच भव्य नजारा दिसला. आयलंड, अमादबलम, खातेंगा, थामसेरकू, फोकशरमा ही शिखरे अजूनच भव्य दिसायला लागली होती तर उजवी कडे खाली फेरीचे गाव दिसत होते. फोटोग्राफी करून पुढे निघालो. आता बऱ्या पैकी सरळ पायवाट होती. डावी कडे बर्फाछादित शिखरे बघत बघत चालत होतो.
पुढे धुक्लाचा चढ आमची वाट बघत होता. त्या चढाच्या आधी हॉटेल मध्ये नाश्ता केला थोडा सुकामेवा खाल्ला व चढ चढायला सुरुवात झाली. १४,००० फुटांच्या वर तुम्हला फक्त काळे, पांढरे, करडे असेच रंग दिसतात. Tree line संपलेली असते. अश्या वातावरणात व उंचीवर चढ चढताना डोकं शांत ठेवून हळू हळू व एका लयीत चालावे लागते. मी असे सर्व नियम पाळून चढत होतो पण तरी १०-१० पावलावर दम लागत होता. ह्या ट्रेक मधला सर्वात जास्त चढ असलेला पट्टा होता. कसे बसे वर पोहोचलो. जे लोक एव्हरेस्ट मोहिमे मध्ये मरण पावले त्यांच्या आठवणीत खूप समाध्या बांधलेल्या दिसल्या. आम्ही ते सगळे बघून पुढे चालायला सुरुवात केली. दुपारी साधारण १ वाजता लोबूचे ला पोहोचलो. आता आम्ही १६,२०० फुटांवर पोहोचलो होतो. मला थोडा high altitude सिकनेस जाणवत होता. डोके दुखायला लागले होते. काहीच खावेसे वाटत नव्हते. तरी पण मी जेवण केले आणि combiflam ची गोळी घेऊन थोड्या वेळ बाहेरच बसून होतो. थोड्यावेळ दुखणे थांबले, पण रात्री परत डोके दुखायला लागले. रात्री परत एक गोळी घेतली. झोपायचा प्रयत्न केला, पण झोप तर कोणालाच लागत नव्हती.
१६ ऑक्टोबर: मध्य रात्रीच उठून आम्ही चालायला सुरुवात केली. बाहेर -२० तापमान होते. त्या मध्ये चालणे फारच कठीण जात होते. थोडेच पुढे गेल्या वर एक बर्फाचा नाला ओलांडताना मेधा घसरून पडली तिच्या अंगाला लागलेल्या सर्व पाण्याचा सेकंदात बर्फ झालेला बघितला. थोडे उजाडले तेव्हा आम्हाला लोबूचे, पुमोरी आणि उजवी कडे नूप्से शिखर दिसायला लागले होते.
गोरखशेप ला पोहोचलो, नाश्ता केला आणि सकाळी १० वाजता काला पत्थर शिखर चढायला सुरुवात केली. हवा एकदम छान होती. माझा altitude sickness मला अजून त्रास देतच होता. श्वासोश्वासाच्या एका लयीत, मनात नामस्मरण करत ध्येयाच्या दिशेने चालत होतो. आता अक्षरशः एक एक पाऊल पुढे टाकताना दम लागत होता, पण प्रत्येक पावलागणिक काला पत्थर समिट जवळ येताना ही दिसत होते. आता समिट वरचे प्रेअर फ्लॅग दिसायला लागले. समोर एकच ध्येय ठेवून चालत होतो. बाकीच काही विचार मनात नव्हते. दुपारी १ वाजता काला पत्थर समिटला पोहोचलो. उंची १८,२०० फुट. रडू कि हसू कळत नव्हते इतका आनंद झाला होता.
![]() |
| काला पत्थर समिट उंची १८,२०० फूट - मी आणि मामा एव्हरेस्ट शिखरा बरोबर |
१७ ऑक्टोबर: आज आम्ही निवांत उठलो. आरामात चालायला सुरुवात केली. वाटेत मला तिबेटियन रामचकोर दिसले. त्यांचे फोटो काढून निवांत चालत फेरीचेला पोहोचलो. तिथे आम्ही फोटोग्राफी व टी ब्रेक घेतला. आजचा पल्ला होता पँगबोचे, दुपारी एक वाजता सगळे जण पँगबोचेला पोहोचलो. आज आम्ही ३,००० फूट खाली उतरून १३,००० फुटांवर खाली आल्यामुळे एकदम छान वाटत होते. त्या बरोबर हवाही खूप छान होती. आमच्या मधल्या काही लोकांनी तिथे १५० नेपाळी रुपये देऊन अंघोळ केली.
शॉवर ची खूप मजेशीर पद्धत तिथे बघितली. बाथरूम मध्ये शॉवर असतो पण पाणी नसते, बाथरूम बाहेर एक शिडी लावलेली असते त्या वर चढून वरच्या टाकीत पाणी टाकले कि शॉवर ला पाणी येते. टॉयलेट मध्ये पण वेगळाच प्रकार होता. पाणी वापरायचे नाहीच, डबा टाकून झाला कि तिथे ठेवलेला पालापाचोळा टाकायचा आणि धुण्यासाठी पेपर वापरायचा अशी पद्धत. मला तर अजिबात पटले नव्हते. पण दुसरा काही पर्याय नव्हता.
१८ ऑक्टोबर: आज सुद्धा निवांत दिवस सुरु झाला. आम्हाला आज थेंगबोचे, फुंकीतेंगा, नामचे बाजार क्रॉस करून जोरसाले ला पोहोचायचे होते. नामचे बाजारला जेवायला भेटायचे ठरले. मी आणि मामा निवांत फोटोग्राफी करत जात होतो. दुपारी रोहन सोडून सगळे जण नामचे बाजारला पोहोचले. सगळ्यांचे जेवण झाली तरी रोहन आला नाही. आमचा राजू गाईड, रोहन ला बघायला पुढे गेला. बाकी टीम ला पण उशीर नको म्हणून पुढे चालायला सांगितले. मी, मामा आणि अरुण मामा असे त्याच हॉटेल मध्ये थांबलो होतो. राजू पुढे जाऊन रोहनला भेटला की तो आम्ही थांबलेल्या हॉटेल मध्ये फोन करणार होता. २ तासांनी त्याचा फोन आला. "रोहन भेटला जोरसाले ला पोहोचला आहे". आमच्या जीवात जीव आला. चहा घेऊन आम्ही चालायला सुरुवात केली खरी, पण मामा आणि माझ्या काय मनात आले आम्ही दोघांनी पळत जायचे ठरवले. साधारण ३ तासाचे अंतर आम्ही १ तासात पार केले आणि जोरसाले ला पोहोचलो.
रोहन, मेधा, वेंकट तिघेही दुसऱ्या दिवशी लवकर लुक्ला ला जाऊन त्याच दिवशीचे विमान मिळेल का प्रयत्न करणार होते. बाकी टीम नी लुक्ला मध्येच राहायचे ठरवले.
१९,२० ऑक्टोबर: ठरल्या प्रमाणे रोहन, मेधा, वेंकट पहाटे लवकर निघून लुक्ला ला पोहोचले व त्यांना त्याच दिवशीचे काठमांडू साठीचे विमान सुद्धा मिळाले. बाकी टीम निवांत लुक्लाला आली.
मी त्या दिवशी विमानं कशी उतरतात व उडतात ह्याचे विडिओ घेत बसलो होतो.
दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी ८.३० वाजता अग्नी एअर चे विमान मिळाले. सर्वजण काठमांडू ला पोहोचलो. हॉटेल वर येऊन इतक्या दिवसाची राहिलेली अंघोळ केली. आवरले आणि काठमांडू मार्केट मध्ये फिरून आलो. आमचे ३ दिवस वाया जाऊन सुद्धा सर्वांचा ट्रेक यशस्वी झाल्या बद्दल 'कुल बहादूर' आमचे व्यवस्थापक ह्यांनी आम्हाला जेवण दिले व प्रत्येकाला काला पत्थर समिट केल्याचे प्रशस्तिपत्रक दिले. तिथे सर्वांनी आपापले अनुभव सांगितले.
परतीचा प्रवास: अमेरिकेवरून आलेल्या सर्वांची २२ ते २३ च्या दरम्यान विमाने होती त्या प्रमाणे ते गेले. मी, मामा आणि रेवती आम्ही काठमांडूला जसे आलो तसेच परतीचा प्रवास चालू केला. सीमे वरील भैरहवा गावात पोहोचलो. आमच्या कडे काही दिवस राखीव होते त्यामुळे आम्ही तिथूनच जवळ असलेले लुम्बिनी - गौतम बुद्धाचे जन्म स्थान बघून आलो आणि सीमा ओलांडून भारतात आलो.
लुम्बिनी- गौतम बुद्धाचे जन्म स्थान व गोरक्षानाथ मंदिर
गोरखपूरला पोहोचलो. तेथील गोरक्षानाथाच्या मंदिरात जाऊन आलो. प्रचंड मोठे मंदीर आहे. गोरखपूरची गीता प्रेस प्रसिद्ध आहे. मंदिरात गीता प्रेसचे दुकान होते. तिथे भेट दिली.
दुसऱ्या दिवशी परत पुणे - गोरखपूर रेल्वेने पुण्याचा ३३ तासांचा प्रवास सुरु केला. २७ ऑक्टोबरला आम्ही पुण्याला सुखरूप पोहोचलो.










khup sunder experience Amod
ReplyDeleteधन्यवाद इरा..!
Delete