एप्रिल २००८
आम्ही अन्नपूर्णा बेस कॅम्प (ABC) ट्रेकला मुद्दामून एप्रिल मध्ये जायचे ठरवले. मामा (चंद्रशेखर बापट- माझे फोटोग्राफी व ट्रेकिंग मधले गुरु) या आधी ३ वेळा ह्या ट्रेकला गेले होते पण काही ना काही कारणा मुळे त्यांचा ट्रेक पूर्ण होऊ शकला नाही. एप्रिल मध्ये जाण्याचे इतर फायदेही होते. रोडोडेंड्रोनच्या झाडांवर लालबुंद फुलांचा बहर असतो आणि पाऊस शक्यतो पडत नाही. ह्या ट्रेक चे पूर्ण नियोजन करण्याची संधी मला मिळाली होती. अर्थात मामांच्या गाईडन्स खाली.
टीम ABC: पुण्यावरून मी, मामा, श्रीपाद गोखले, गिरीश जोशी, माधुरी जोशी, शर्वरी जोशी, रुपाली राजगुरू व मुंबई वरून हृषीकेश पेठे व कलकोटी काका.
ट्रेक रूट: पोखरा ते बीरेथाती जीपने. बीरेथाती - थीकेदूंगा - घोरेपानी - ताडापानी - चोमरुंग - दोवन - ABC - परत येताना चोमरुंग पर्यंत तोच मार्ग - सिओली बाजार - बीरेथाती.
ह्या ट्रेकसाठी नेपाळ, पोखरा मधून जावे लागते. मामां कडून ऐकले होते की नेपाळ गिर्यारोहणाच्या बाबतीत भारताच्या तुलनेत खूपच पुढारलेले आहे. नेपाळ सारख्या लहानश्या देशाची अर्थव्यवस्था गिर्यारोहण आणि टूर्स ह्या वर जास्तीत जास्त अवलंबून आहे. इथले ट्रेक रूट खूपच विकसित आहेत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी छोटी छोटी गावं वसलेली आहेत. तेथे राहण्याच्या व खाण्याच्या उत्तम व स्वछ सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही ट्रेकला फक्त आमचे सामान व कॅमेरा किट घेऊन निघालो.
१७ एप्रिल २००८ आम्ही पुण्यावरून पुणे - गोरखपूर एक्सप्रेस ने निघालो. ३३ तासाचा प्रवास होता. १९ एप्रिल (पहाटे ५ ला) गाडी गोरखपूर स्टेशन ला पोहोचली. गोरखपूर- प्रचंड मोठे रेल्वे स्टेशन, जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म इथे आहे. एका प्लॅटफॉर्म वर दोन रेल्वे पाठोपाठ थांबून, परत जागा शिल्लक रहाते. आम्ही मुबंई वरून येणारे पेठे व कलकोटी काका ची वाट बघत प्लॅटफॉर्म वरच थांबलो होतो. त्यांची रेल्वे खर तर आमच्या आधी येणार होती पण तिलाच उशीर झाला. ते दोघे येई पर्यंत आम्ही चहा-नाश्ता करून घेतला. सकाळी ९.३० वाजता ते दोघे आले. आम्ही स्टेशन बाहेर आलो व जीपने भारत - नेपाळ सीमा लगत चे गाव- सोनौली इथे जायला निघालो. साधारण २ तासात सोनौली ला पोहोचलो.
| भारत-नेपाळ सीमा |
तिथून भारत - नेपाळ सीमा ओलांडून नेपाळमधल्या भैरहवा गावात पोहोचलो. पोहोचायला उशीर झाला होता त्यामुळे वाटले आजचा मुक्काम भैरहवा मधेच करावा लागतो कि काय. पण नशिबाने एक सुमो मिळाली. दुपारचे जेवण झालं आणि पुढचा प्रवास सुरु झाला. पूर्ण प्रवास हा नागमोडी रस्त्यावरून असल्याने जोशी बुआ आणि शर्वरी आधीच गोळ्या खाऊन बसले होते. पण प्रवासात रुपालीला मळमळल्या सारखे व्हायला लागले. आम्ही विचारले "तुला गाडी लागते का?" तर म्हणाली, तिलाही हे आत्ताच समजले. गाडीत एकदम हास्यस्फोट झाला..! जोशी बुवानी तिला पण गोळी दिली. प्रवास करून खर तर सगळे खूप दमले होते. पोखरा ला पोहोचण्यासाठी ८ तास लागणार होते. आम्ही पोखरा ला पोहोचलो, तेव्हा सर्व सामसूम झाले होते. आमचा गाडीवाला आम्हाला नेपाळी गेस्ट हाऊस ला घेऊन गेला. तीथे पोहोचल्या वर सगळ्यांनी हुश्श केले ...! जवळ जवळ ४५ तासांनी आमचा प्रवास संपला होता.
२० एप्रिल - आज आराम आणि ट्रेक ची तयारी करण्याचा दिवस होता. पोखरा हे अतिशय सुंदर गाव, त्याच्या मधोमध एक तलाव आहे "फेवा ताल" त्याच्या आजूबाजूला सर्वत्र हॉटेल्स होती. नेपाळी गेस्ट हाऊस च्या मालकाला आम्ही ABC ला जायचा परवाना व गाईड देण्याची विनंती केली. आम्हाला कुमार नावाचा गाईड मिळाला आणि परवान्यासाठी आम्हला फॉरेस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल असे समजले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी परवाना घेऊन पुढे जाऊया असे ठरवले.
२१ एप्रिल: सकाळी लवकरच आम्ही पोखरा ते नयापूलला जाण्यास निघालो. जाताना मध्ये फॉरेस्ट ऑफिस मधून सर्वांचे ट्रेकचे परवाने घेतले. ट्रेक रूट वर मधल्या मधल्या गावांमध्ये चेक पोस्ट आहेत तिथे हे ID कार्ड दाखवून पुढे जायचे असा नियम आहे. त्या फॉरेस्ट ऑफिस मध्ये बराच वेळ गेला. तिथून निघालो, गाडी टाटा २०७ असल्या मुळे मी श्रीपाद काका, जोशी काकू, शर्वरी आणि आमचा गाईड कुमार आम्ही मागे कॅम्पर मध्ये बसलो होतो. बाहेरचा सुंदर निसर्ग बघत, प्रवासाची मजा घेत आम्ही नयापूल ला कधी पोहोचलो कळले नाही. नयापूल वरून पूल ओलांडला कि बीरेथाती सुरु होते.
![]() |
| गिर्यारोहण करण्यासाठीचा परवाना |
| बीरेथाती गाव |
बीरेथाती गावातून लाकडी काठ्या (walking sticks) घेतल्या आणि ट्रेक सुरु केला. उशीर झालाच होता. त्या मुळे आम्ही पहिला टप्पा म्हणजे थीकेदूंगा ला पोहोचू असे वाटत नव्हते. ट्रेक सुरु करण्या आधी चेक पोस्टवर परवाना दाखवून आम्ही पुढे निघालो. प्रशस्त पायवाट, एका बाजूने नदी तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल असलेला डोंगर. निसर्गाच्या कुशीत बागडणं म्हणजे काय ह्याचा प्रत्यय येत होता म्हणा ना..! अश्या वातावरणात फक्त पायखालच्या पाचोळ्याची चुरचुर, नदीचा खळखळाट एवढेच आवाज ऐकू येत होते. खालून वाहणारे स्वछ पांढरे शुभ्र पाणी, दुसऱ्या बाजूला हिरवे गार रान आणि समोर पसरलेली अंतहीन पायवाट, हे पाहून माझ्या सारख्या पुणेकराला सह्याद्री पर्वतरांगांची आठवण न होती - तरच नवल. हिमालयातील गिर्यारोहण करताकरता आजूबाजूची बर्फाच्छादित शिखरं पाहायची व कॅमेरा मध्ये कैद करायची सवय अंगवळणी पडली होती. पण बीरेथाती गावाची उंची ३,५०० फुट असल्याने फक्त घनदाट जंगल, नद्या, झरे हेच बघायला मिळणार होते.
ट्रेक मध्ये सुरवाती पासूनच चढण असल्याने पाठीवरती "जड झाले ओझे" ची भावना येत होती आणि चालायचा वेग मंदावला होता. सर्व जण खूप थकले होते. सगळ्यांच्या मध्ये खूप अंतर पडत होते. पण ह्यावरूनच पुढे कोण कोण कसे येऊ शकणार आहे ह्याचा अंदाज आला. कुमार ने आम्हाला वाटेतील सुदामे नावाच्या गावात मुक्काम करायला सांगितले. सुदामे गावाची उंची होती ४,००० फूट. मी, मामा, श्रीपाद काका, शर्वरी आम्ही पोहोचलो, चहा झाला तरी अजून बाकीची मंडळी येतच होती. सर्वात शेवटी रुपाली होती, तिथेच तिला "गार्डचा डबा" असे नाव पडलं आणि दमलेल्या चेहऱ्यांवर जरा हास्य पसरलं.
आज साधारण ४ ते ५ किमी चालून झाले असेल. पण हिमालयातील चढणीचे ५ किमी पण दमछाक करणारे असतात. हॉटेल मध्ये जेवायला आम्हाला खाता येईल असे डाळ-भात, भाजी, नूडल्स, चाऊमिन, ऑम्लेट, मॅगी हेच मिळत होते. आता पुढे ११ दिवस आम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर ला हेच आलटून पालटून खायचे होते. जेवण करून गप्पा मारत बसलो. तेव्हा मामांनी शर्वरी ला सांगितले ह्या भागात सगळे "लोडगे" आडनावाचे लोक राहतात आणि सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत, तिला ते खरच वाटले. दुसऱ्या दिवशीच्या कॅम्प साईटला पोहोचलो तरी तिला "लोडगे" म्हणजे "lodge" हे कळले नाही. आम्ही सगळे तेव्हढीच मजा घेत होतो. उद्या चा ट्रेक रूट कसा असेल व किती जाता येईल कुमार ला विचारताच त्याने एका शब्दात उत्तर दिले "चढ, चढ आणि चढ". एकंदरीत सगळ्यांचीच मजा होणार होती!
"हिमालयातील ट्रेक सुरु झाला की प्लॅन प्रमाणेच होते असे नाही."
२२ एप्रिल: आज सकाळी ठरवल्या प्रमाणे घोरेपानी ला पोहोचायचे होते. अंतर साधारण १८ किमी होता. रस्ता कालच्या सारखाच नदी, जंगल, झऱ्यांचा होता. सकाळी नाष्ट्याला ऑम्लेट व मॅगी असे दोनच पर्याय होते. श्रीपाद काका ऑम्लेट खात नाही व सकाळी सकाळी त्यांना मॅगी नको होती. अजून काय मिळेल असे विचारले तर उकडलेले बटाटे मिळाले, ते तिखट-मीठ लावून त्यांनी खाल्ले व थोडे बरोबर पण घेतले. वाटेत खायला होतील म्हणून. आम्ही त्या सुंदर पायवाटेवरून चालायला सुरवात केली. नेपाळ मध्ये एक सोय चांगली आहे, दोन डोंगराच्या मध्ये लोखंडी दोऱ्यांचे पूल बांधले आहेत. पूल असला की एक डोंगर पूर्ण उतरून, पुन्हा दुसरा पायथ्या पासून चढवा लागत नाही. आता खर तर बर्फाछादित शिखर पाहायची ओढ लागली होती. पुढे एका ठिकाणी कुमार ने सांगितले आपल्याला तो समोरचा डोंगर चढायचा आहे आणि वातावरण छान असले तर तुमच्यासाठी एक सरप्राईझ आहे. बघितले तर त्या डोंगराचा टॉप पण दिसत नव्हता! पण सरप्राईझ डोळ्या समोर ठेवून चढायला सुरवात केली. ट्रेकिंग म्हटले कि चढ हा आलाच आणि मनाची तयारी ही झालेली असते, तरीदेखील हा चढ चढताना मात्र चांगलीच वाट लगली. आम्ही साधारण ४,००० फूट चढून वर आलो. उंची १०,००० फूट अशी पाटी दिसली. इथून high altitude सुरु होते!
| अन्नपूर्णा साऊथ चे प्रथम दर्शन |
वर एक गाव वसलेले होते. पुढे एका वळणावर एकदम 'अन्नपूर्णा साऊथ' शिखराने दर्शन दिले. मी चढून आल्यावर लागलेला दम विसरून आधी फोटो काढायला सुरवात केली. आता हवेतही चांगलाच गारवा जाणवत होता. त्या गावात एक शाळा पण होती. पायवाटेवरील गावातील लहान मुले गिर्यारोहकां कडे बघून निरागस पणे "नमस्ते नमस्ते" म्हणत होती, असे म्हणले कि गिर्यारोहकही त्यांना हसून नमस्ते म्हणत गोळ्या-चॉकलेट देत असत. त्या गावातून पुढे परत उतार सुरु झाला. वाटले होते एवढ्या उंची वर आलो आहोत आता सगळा रस्ता वरवरच असेल पण कसले काय! आम्ही २,००० फूट उतरलो. तो पर्यंत संध्याकाळ झाली होती. साधारण आज ८ किमी चालून झाले असेल. आम्ही परत नियोजित ठिकाणी न पोहोचता वाटेतील नागेथाती गावात राहायचे ठरले. उंची होती ८,००० फूट. आता चांगलीच थंडी जाणवायला लागली होती. जेवण झाल्यावर सर्व जण गप्पा मारत होतो. आजचे जे चढण चढलो त्या बद्दल सर्व जण आपापले अनुभव सांगत होते. मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एका दिवसात एवढे चढण चढलो असेन. त्याच आठवणीं मध्ये झोपलो.
२३ एप्रिल: आजचा पल्ला होता घोरेपानी. ह्या ट्रेक मध्ये डोंगराच्या विविध भागातून चालायला मिळाले. कधी डोंगराच्या कडे कडे ने, तर कधी डोंगर चढून पार केले, तर कधी डोंगराला वळसे मारत होतो.आजची सुरवात फारच सौम्य चढणी ने होती. बऱ्या पैकी अंतर चालून गेल्यावर रोडोडेंड्रोन ची झाडं सुरु झाली व बघता बघता पूर्ण पायवाटच रोडोडेंड्रोनच्या फुलांनी बहरुन गेली. अत्यतं सुंदर असा नजारा होता. आम्ही फोटोग्राफी ब्रेक घेतला. रोडोडेंड्रोनच्या फुलांना एकमादक सुगंध असतो. तो त्या आजूबाजूच्या जंगलात पसरला होता, अतिशय सुंदर अशी दुपार होती ती. आम्ही रोडोडेंड्रोनच्या फुलां बरोबर डोंगर, नद्या, झरे अशा येथेच्छ फोटोग्राफीत गुंगून गेलो.
| रोडोडेंड्रोनच्या फुलांनी बहरलेला परिसर |
पण थांबून चालणार नव्हते, आम्ही पुढे निघालो. रोडोडेंड्रोनची झाडे दिसत होती पण त्या मागचा डोंगर दिसला नाही. कुमार म्हणाला, "हा डोंगर चढून जायचे आहे." चला, परत मजा येणार होती त्या खड्या चढा वरून जाताना. वर आलो आणि बघितले तर परत उतार सुरु झाला. आम्हाला वाटले उतार आहे म्हणजे पुढे परत चढावे लागणार, पण थोड्याच वेळात घोरेपानी आले. उंची ९,२०० फूट. हिमालयात दिवस लवकर सुरु होतो व लवकर मावळतो. चालता चालता किती ही घाम आला तरी मुक्कामाला थांबलो की काही मिनिटातच थंडावा जाणवू लागतो. म्हणून आधी आम्ही गरम कपडे चढवून, गरम गरम चहा चा आनंद घेतला.
आमच्या मुक्कामाच्या ठिकाणा वरून एक रस्ता पुनहील ला जात होता तर एक ताडापानीला. आमचा पुढचा टप्पा होता ताडापानी. सगळे हॉटेल मध्ये स्थिरस्थावर झाले. रात्री जेवण करताना कळले की कलकोटी काकांच्या अंगात ताप आहे व थोडा सर्दी खोकला पण झाला आहे. काकांनी औषध घेतले होते पण तरी ताप उतरत नव्हता. त्यामुळे त्यांनी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. आमच्या कडे तसे काही दिवस राखीव होते. आम्ही सर्वांनी काकां बरोबर एक दिवस तिथेच थांबायचे ठरवले. तेवढेच त्यांना बरे वाटले तर आमच्या बरोबर पुढे येतील व १०,००० फुटांवर सर्वांचे Acclimatization चांगले होईल.
"कदाचित निसर्गाचे आपले काही प्लॅन्स असतील ! निसर्गाच्या कुशीत राहून आपण त्याचा आनंद घ्यावा, अश्या वेळेस आपण त्याच्या प्लॅन्स ना धक्का लावू नये. हीच तत्वे कायम मनात असतात. पण अश्या वेळी, इतर व्यावहारिक गोष्टी हि आठवतात आणि ह्या पेक्षा हि समिट ची ओढ असते. त्यामुळे आपल्याला आपले प्लॅन्स पण पाळावे लागतात", असे म्हणत मनाशी पुढच्या दिवसाच्या पूर्ण करायच्या टप्प्याची उजळणी करत झोपून गेलो.
२४ एप्रिल: आजचा दिवस आम्ही आराम केला. थोडे फार पुढे चालून आलो. कलकोटी काकांची तब्येत काही बरोबर दिसत नव्हती. शेवटी असे ठरवले की कलकोटी काका पुढे येणार नाहीत. त्यांना बरे वाटले की चोमरुंग पर्यंत येऊन थांबतील. बाकी टीम उद्या पुढे निघेल.
२५ एप्रिल: काकांना टाटा करून आम्ही निघालो. आजचा पडाव होता ताडापानी. आज सुरुवात करतानाच उतार सुरु झाला पण ह्याचा अर्थ पुढे कुठे तरी चढ वाट बघत होता. थोडे पुढे गेल्यावर तर आणखीनच तीव्र उतार सुरु झाला एक डोंगर पूर्ण उतरायचा होता. पायवाट तर खरच वाट लावणारी होती. १.५ ते २ फुटांच्या पायऱ्या होत्या. उतरून उतरून गुढगे दुखायला लागले होते. वाट तशी निमुळती होती त्यामुळे खूप काळजी घेऊन चालावे लागत होते. अचानक माझा पाय सटकला आणि मी २पायऱ्या खाली घसरून पडलो. मी काठीने व हाताने जे मिळेल ते धरून आधार घेण्याचा प्रयत्न केला.
पडल्यावर आधी कॅमेरा कसा आहे ते चेक केले. कॅमेरा व्यवस्थित होता पण कोपरा पासून करंगळी पर्यंत उजवा हात सोलला गेला होता. कोपरा पाशी तर चांगलीच अर्धा इंच खोल जखम झाली होती. थोडे अजून खाली जाऊन आम्ही जरा पायवाट सोडून कडेला थांबलो. पाण्याने जखम स्वछ धुतली, मामानी iodine ointment आणले होते, ते त्या जखमे मध्ये चक्क ओतले व बँडेज बांधले. २ मिनीटे शांत थांबलो. पुढचा उतार सावकाश उतरलो, पुढे चढ आमची वाट बघतच होता. तो चढून ताडापानी ला पोहोचायला संध्याकाळ झाली. उंची होती ८,५०० फूट. तसे सगळी कडेच ढग होते पण आमचे स्वागत माच्छपुछरे शिखराने केले. ते फारच अफलातून दिसत होते. मी फोटो काढले, पण थोड्याच वेळात त्यावरही ढगांनी पडदा पडला. आम्ही हॉटेल मध्ये आराम केला आणि लवकर जेवण करून दुसऱ्या दिवशी शिखरे दिसतील ह्या आशेने झोपून गेलो.
२६ एप्रिल: पहाटे लवकर उठलो तरी ढग होतेच त्या मुळे शिखरे काही नीट दिसत नव्हते. थोडे फार "रेकॉर्ड फोटो" काढून आम्ही निघालो. आजच्या दिवसाची सुरवात पण उताराने केली. हीच खासियत आहे ह्या ट्रेक ची, कधी उतार तर कधी चढ! आपण किती उंची वर पोहोचलो आहोत कळतच नाही. आजचा पडाव होता चोमरुंग. ह्या गावाबद्दल खूप ऐकले होते गाव खूप सुंदर व तिथून दिसणारा नजारा तर अजून सुंदर. आज पण असेच डोंगर उतरत चढत आम्ही चोमरुंग ला पोहोचलो. उंची होती ७,२०० फूट. हे गाव डोंगराच्या माथ्या पासून पायथ्या पर्यंत पसरले होते. आम्ही साधारण गावाच्या मध्य भागातील हॉटेल मुक्कामाला निवडले. तिथून अन्नपूर्णा व माच्छपुछरे दोन्ही शिखरे अत्यंत सुंदर दिसत होती. मला तर जागा खूप आवडली होती. असे वाटत होते इथेच कायमचे रहावे. चोमरुंग ची ती संध्याकाळ खूपच सुंदर होती. हॉटेलला पुढे अंगणासारखी जागा होती तिथे बसून अन्नपूर्णा व माच्छपुछरे शिखरे बघत चहाचा आस्वाद घेत बसलो आणि मस्त पत्त्यांचा डाव मांडला.
| चोमरुंग कॅम्प |
आमच्या हॉटेल शेजारीच एक बेकरी होती तिथे आम्हाला ब्रेड मिळाला. खूप दिवसानी आम्हाला काही तरी वेगळे खायला मिळाले होते. तीच-तीच भाजी, डाळ-भात, fried rice खाऊन कंटाळा आला होता. ब्रेड घेतला खरा, पण १५० नेपाळी रुपयांना एक मोठा ब्रेड खूपच महाग प्रकरण होते. त्यातून शर्वरी केक पण खाऊया म्हणत होती. पण जोशी बुवांनी तिच्या इच्छेला सावरले. जेवण झाल्यावर झोपायच्या आधी शर्वरीने आमच्या सर्वांसाठी छान गाणे गायले, गाण्याचे बोल होते "सांग तू माझा होशील का?" मी ते रेकॉर्ड पण करून ठेवले.
२७ एप्रिल: पहाटे लवकर मामांनी हाक मारली "आधी बाहेर ये कॅमेरा घेऊन." मी उठून बाहेर आलो तर अन्नपूर्णा आणि माच्छपुछरे शिखरं अत्यंत सुंदर दिसत होती. मस्त त्या गार हवेत चहा घेत फोटोग्राफी करत होतो. फोटोग्राफी झाली नाश्ता झाला व पुढच्या प्रवासाला निघालो.
आज आम्ही दोवन किंवा हिमालया कॅम्प च्या मुक्कामाला पोहोचायचे ठरवले होते. साधारण ६ ते ७ तास चालायचे होते. चोमरुंग उतरून सिनुवाचा चढ चढायला सुरुवात केली. जेवढे चोमरुंग उतरलो होतो तेवढेच सिनुवासाठी चढायचे होते. वर आल्या वर समोर परत उतार सुरु झाला तो 'बांबू' पर्यंत उतार होता, तिथे आम्ही जेवायला थांबलो. ही पायवाट ऊन-सावली चा खेळ खेळणारी होती. पायवाटेवरून चालताना उजवी कडे माच्छपुछरे शिखर दिसतच होते. 'बांबू' गावातून कुमार ने आमच्या बरोबर अजून एका मुलाला बरोबर घेतले. तो मुलगा गाईड चे प्रशिक्षण घेत होता आणि त्याचे प्रॅक्टिकल राहिले होते त्या साठी तो आमच्या बरोबर पुढे आला. असेच चढ उतार चालत आम्ही हिमालया गेस्ट हाऊसला पोहोचलो. उंची होती ९,५०० फूट. आता शिखरांच्या जवळ आल्याने चांगलीच थंडी जाणत होती. हवा खराब होऊन पाऊस पडायला सुरुवात झाली. आम्ही सगळे जेवण करून गप्पा मारत बसलो. उद्याचा दिवस मुख्य होता. आम्ही ABC ला पोहोचणार होतो. कधी एकदा सकाळ होतीये आणि आम्ही चालायला सुरुवात करतो असे झाले होते.
२८ एप्रिल: रात्री पाऊस पडून गेल्या मुळे हवा स्वछ झाली होती. माच्छपुछरे शिखर छान दिसायला लागले होते. आज आम्ही अन्नपूर्णा बेस कॅम्प ला जाणार होतो सगळे खूपच उत्साही होते. नाश्ता करून चालायला सुरुवात केली. थोडे पुढे गेल्या वर माच्छपुछरे शिखर आणि दरी छान दिसायला लागेले होते. फोटो काढायला थांबलो तेव्हा मामा म्हणाले "ह्याला हिंकू केव्ह म्हणतात" त्याच्या थोडे पुढून त्यांना तीन वेळा परत मागे यावे लागले होते. कारण पुढे एक avalanche prone एरिया होता. त्या वेळेस तिथे खूप सारा बर्फ होता.
ह्याच कारणाने आम्ही गेलो तेव्हा पायवाट नदीच्या बाजूला वळवली होती. मोदिखोला (खोला म्हणजे नदी) ओलांडून पुढे जायचे होते. साधारण दुपारी माच्छपुछरे बेस कॅम्प ला जेवायला पोहोचलो. माच्छपुछरे शिखराने ढगांच्या आडून दर्शन दिले व ढगात गुडूप झाले. जेवण झाल्यावर पुढे चालायला सुरु करणार तेवढ्या बर्फ पडायला सुरुवात झाली. पॉन्चो (बरसाती) घालून चालायला सुरुवात केली. शेवटचे १ तासाचे अंतर राहिले होते पण उंची, थंडी, बर्फ ह्या मुळे आपण खूप चालतोय तरी येतच नाही आहे अशी भावना होती. चालताना मधेच ढगांमुळे पुढेच काहीच दिसत नव्हते. अचानक ढग बाजूला झाले आणि "Welcome to Annapurna Base Camp 13,550 ft" ही पाटी दिसली. आनंद गगनात मावेनासा झाला. मी आणि शर्वरी पुढे मागे होतो, आधी त्या पाटी बरोबर फोटो काढला.
वर गेलो, हॉटेल मध्ये सामन ठेवून पॉन्चो काढला, गरम कपडे चढवले आणि चहा चा आस्वाद घेत आधी जाऊन मामांचे अभिनंदन केले. ३ वेळा माघार घेऊन चौथ्यांदा ते ABC ला पोहोचले होते. मी, मामा, श्रीपाद काका, पेठे, शर्वरी पहिल्या बॅच मध्ये पोहोचलो. आमचा चहा झाल्या वर जोशी बुवा, जोशी काकू आणि रुपाली (गार्डचा डबा) पोहोचले. तोवर बर्फ पडायचा पण थांबला होता. सगळे जण खूपच आनंदी होते, प्रत्येक जण एकमेकांचे अभिनंदन करत होता. संध्याकाळी ढग खाली बसतील ह्या आशेने बाहेर गेलो तर ढग होतेच त्या मुळे कुठेले शिखर कसे दिसते काही समजत नव्हते. कुमार म्हणाला "उद्या सकाळी सगळे काही छान दिसेल." संध्याकाळी ढग असतानाच एका शेर्पानी माझ्या कॅमेऱ्यातून विडिओ केला.
२९ एप्रिल: उंची १३,५५० फूट असल्याने रात्री झोप काही नीट लागलीच नाही.पहाटे मामांची हाक आली "मोद्या, उठ कॅमेरा घेऊन पहिला बाहेर ये". एक अवर्णनीय पहाट जी कधीच मी विसरू शकत नाही. सूर्याची पहिली किरणं अन्नपूर्णा साऊथ शिखरावर पडल्याने शिखर सोन्या सारखे चमकत होते. हळू हळू सूर्यकिरणांनी संपूर्ण परिसर उजळला. असे वाटत होते आम्ही एका बाउल मध्ये आहोत व सर्व बाजूनी शिखरांनी वेढले आहे. थंडी इतकी होती की कॅमेरा क्लिक करायला सुद्धा कष्ट पडत होते.
| अन्नपूर्णा साऊथ- उंची २३,६८४ फूट |
| माच्छपुछरे- २२,९४० फूट |
![]() |
| अन्नपूर्णा बेस कॅम्प - टीम |
जगातील दहावे सर्वात उंच शिखर अन्नपूर्णा-१ आपल्याला इथे खूप जवळून दिसते. तो सुंदर नजारा बघण्यात व फोटोग्राफी करण्यात खूप वेळ गेला. आज आम्हाला नाश्ता करून निघायचे होते. निघताना तिथे ग्रुप फोटो काढला व सर्व शिखरांना नमन करून उतरायला सुरवात केली. हवा खूपच छान होती. खाली उतरताना वेगवेगळे निसर्गाचे फोटो टिपत चालत होतो. जसे खाली आलो तशी थंडी पळाली, एवढे चालून सगळ्यांचे पाय चांगलेच तयार झाले होते. हिंकु केव्ह पाशी आलॊ आणि पाऊस सुरु झाला. पॉन्चो चढवून चालायला सुरुवात केली. आम्ही हिमालया गेस्ट हाऊसच्या पुढे दोवन ला पोहोचलो. उंची होती ८,५०० फूट. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. आम्ही आपल्या सकाळच्या आठवणीत संध्याकाळ घालवली व जेवण करून झोपलो.
३० एप्रिल: नेहमी प्रमाणे स्वछ सकाळ. माच्छपुछरे शिखरा मागून सूर्यकिरणे विस्तारली होती. फोटो काढून पुढे उतरायला सुरुवात केली. येताना चढ उतार दोन्ही असल्या मुळे परत जाताना पण तशीच पायवाट होती. बांबू गावात थोडावेळ थांबलो.
पुढे बांबू वरून सिनुवा पर्यंत भयंकर चढ होता. हे अंतर जाण्यास साधारण २ तास लागतात पण मला आणि श्रीपाद काकांना काय हुक्की आली माहिती नाही बांबू ते सिनुवा आम्ही चक्क पळत गेलो. आम्हाला ४५ मिनिटे लागली. सिनुवा ला जेवायला थांबलो. तिथे, मला एक जपानी ग्रुप भेटला. मला जपानी बोलता येते हे त्यांना कळल्यावर ते खूपच आश्चर्यचकित झाले. मला पण छान वाटले, आपण शिकलेल्या भाषेचा इतक्या लांबवर येऊन उपयोग झाला. जेवायला थांबलो होतो त्या हॉटेल वरून समोर चोमरुंग दिसत होते आणि चोमरुंग ला जाण्यासाठीचा रस्ता पण दिसत होता. चांगलीच चढण होती. सिनुवा चा उतार उतरून चोमरुंग खोला ओलांडली व चढ सुरु झाला. आधी बांबू ते सिनुवा पळाल्या मुळे हा चढ चढताना वाट लागली होती. कधी एकदा चढ संपतोय असे झाले. वर गेल्यावर कळले, आधीचे पळणे श्रीपाद काकाच्या मांडीवर बेतले आहे. त्यांच्या मांडीच्या स्नायूला अतिरिक्त ताण आला होता त्यामुळे चालायला खूपच त्रास होत होता. आमची तर वाट लागली होतीच पण हॉटेलवर पोहोचल्या वर कट्ट्या वर बसून, सगळे गिर्यारोहक हा चढ चढताना कसे पेकले आहेत ते बघत बसलो होतो. त्यात आमची पण टीम होतीच. सर्वजण पोहोचल्यावर कळले की कलकोटी काका इथे पोहोचले आहेत. ऐकून आनंद झाला, ते आमच्या हॉटेल च्या शेजारच्याच हॉटेल मध्ये थांबले होते. त्यांना ABC च्या आठवणी सांगण्यात ती संध्याकाळ गेली.
१, २ मे: आज परत अन्नपूर्णा आणि माच्छपुछरे शिखरांचे दर्शन घेऊन खाली उतरायला सुरुवात केली. चोमरुंग ७,२०० फुटांवरून आम्ही आज सिओली बाजार ला पोहोचलो उंची ४,००० फूट. थंडी गायब झाली उकडायला लागले. मी त्या गावात १० दिवसांनी अंघोळ केली. इतके दिवसात मी पडलो होतो, मला जखम झाली आहे हे सगळे विसरलो होतो. अंघोळ करायच्या आधी बांधलेले बँडेज काढून बघितले तर अर्ध्याच्या वर जखम भरली गेली होती. हिमालयातील हवा व अंघोळ नाही त्यामुळे हे घडले. श्रीपाद काकांची मांडी अजूनही दुखत होती. पेठ्याच्या पायाला आजचा उतार उतरून ब्लिस्टर आले होते. त्याला बूटही धड घालता येत नव्हते.
दुसऱ्या दिवशी चे चालणे अगदीच रस्त्या वर चालण्या सारखे होते. आमच्या पायांना चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते कारण गेले १० दिवस डोंगर चढ उतार करायची सवय लागली होती. सिओली बाजार वरून बीरेथातीला पोहोचलो तिथे सर्व जण सुखरूप परत आलो हे चेक पोस्ट वर सांगितले व जीप करून पोखराला आलो.
परतीचा प्रवास: आलो त्या दिवशी आराम केला. दुसऱ्या दिवशी फेवा ताल परिसरात जत्रा भरली होती. तिथे सगळ्यांनी मजा केली. पुढील दिवशी परतीचा प्रवास सुरु झाला.
गोरखपूर ला पोहोचलो. तेथील गोरक्षानाथाच्या मंदिरात जाऊन आलो. प्रचंड मोठे मंदीर आहे. गोरखपूर ची गीता प्रेस प्रसिद्ध आहे. मंदिरात गीता प्रेस चे दुकान होते तिथे भेट दिली. दुसऱ्या दिवशी परत त्याच रेल्वे ने पुण्याचा ३३ तासांचा प्रवास सुरु केला. ५ मे ला सर्व पुण्याला सुखरूप पोहोचलो.
![]() |
| अन्नपूर्णा १ - उंची २६,५४५ फूट |





सगळा ट्रेक डोळयांपुढे उभा केला आहेस, अमोद. खूप छान शब्दांकन.
ReplyDeleteधन्यवाद भक्ती
Deleteखूप छान लिहिलंय अमोद आणि फोटो पण सूरेख
ReplyDeleteधन्यवाद इरा...!
DeleteAmod, congrats, finally you started the blog. Now waiting for next one, EBC? But that was also 2008, did you do 2 major treks in 2008? Lucky you! Sorry did not have the patience to comment in Marathi!
ReplyDeleteThank your very much..! Yes in 2008 I did two treks ABC and EBC. Blog is in progress.
ReplyDeleteJoshi mast ekdam
ReplyDelete