टीम रुपकुंड: मी, अर्चना, चंद्रशेखर बापट (मामा), श्रीपाद गोखले, नितीन पोरे, देवेंद्र पोरे, मीनाक्षी पोरे, शंतनू खर्डे, ललित देशमुख, विजय वैद्य, संकेत कवठेकर, कीर्ती कानडे, सुरजित मुखोपाध्याय
ट्रेक रूट: लोहाजंग - दिदना - अलीबुग्याल - वेदनी बुग्याल - भगुवाबास - रुपकुंड - पाथेरनाचनी - वेदनी बुग्याल - दिदना - लोहाजंग
| रुपकुंड उंची १६,४७० फूट - The Skeleton Lake |
२०१३ साल मी कधीच विसरू शकणार नाही. जून २०१३ साली केदारनाथ मध्ये झालेली ढगफुटी व बाकी उत्तराखंडात झालेला प्रचंड पाऊस ह्याने पूर्ण उत्तराखंडात प्रलय आला होता.
रुपकुंडला ऑगस्ट मध्ये जायचे, आम्ही मे महिन्यातच निश्चित केले होते. राजेश नेगी बरोबर तसे बोलणे ही झाले होते. त्याला मी थोडे ऍडव्हान्स पैसे ही पण पाठवले होते. आम्ही एकूण २० जण होतो. ढगफुटीची बातमी कळताच आमच्यातील ७ जण रद्द झाले. मी राजेश आणि मामांशी बोलून ठरवत होतो काय करता येईल. आम्ही काही झाले तरी जायचे असेच ठरवले. ८ दिवसाचा ट्रेक होता, आम्ही अजून ४ दिवस राखीव ठेवून प्लॅन आखला. उत्तराखंडाचे गढवाल व कुमाऊं असे दोन भाग आहेत. त्या मधील गढवाल मध्ये त्या प्रलयामुळे प्रचंड प्रमाणात पडझड झाली होती. कुमाऊं मधील रस्ते जरा बरे होते. आम्ही त्या रस्त्यांनी लोहाजंग पर्यंत पोहोचायचे असे ठरवले.
रुपकुंड, उंची १६,४७० फूट - एक रहस्यमय व काल्पनिक कथांनी प्रसिद्ध असा तलाव. अशी आख्यायिका आहे की पूर्वी इथून दुसऱ्या देशात व्यापार करायला लोक जात असत. एके दिवशी जात असताना प्रचंड मोठे हिमवादळ आले व सर्व जण त्या मध्ये गाडले गेले. तर काही जण म्हणतात त्या भागातील "नंदा राज जात" यात्रा ही त्या भागातून जात होती. तेव्हा प्रचंड मोठे हिमवादळ आले व सर्व जण त्या मध्ये गाडले गेले. उंची, थंड हवा, बर्फ ह्यामुळे ही मानवी हाडे आजही त्या ठिकाणी जतन झाली आहेत. संशोधनात असे लक्षात आले आहे की ही हाडे, काही ९व्या शतकातील तर काही १९व्या शतकातील आहेत. वर्षातील फक्त एकच महिना "ऑगस्ट" मध्ये तलावात पाणी असते, त्यामुळे आपण हे हाडांचे सापळे बघू शकतो. बाकी वर्षभर हे बर्फामध्ये गाडले गेलेले असतात.
२०,२१,२२ ऑगस्ट: आम्ही २० ऑगस्टला पुणे - दिल्ली दुरान्तो एक्सप्रेसने निघालो. २१ तारखेला सकाळी दिल्लीला पोहोचलो. तिथून पुढे काठगोदामला बसने निघालो. दिल्ली मध्ये प्रचंड उकडत असल्यामुळे, सगळ्यांचे बस मध्ये उकडलेले बटाटे झाले होते. त्यातून त्या बस वाल्याने टोल चुकवण्यासाठी खुपच खराब रस्त्या वरून गाडी नेली. त्यामुळे येताना बसने यायचे नाही हे निश्चित होते. साधारण संध्याकाळी ५ च्या दरम्यान काठगोदामला पोहोचलो. आम्ही बस मधून उतरताच पाऊस सुरु झाला, सगळे जण दिसेल त्याआडोश्याला धावले. मी एका हॉटेल मध्ये शिरलो आणि त्याच्याशी दर निश्चित करून रूम बुक केल्या. तोवर पाऊसही थांबला होता. बाकी टीम पण हॉटेल मध्ये आली. तेव्हा कळले की रस्त्या वरून एवढे जोरात पाणी वाहत होते की हॉटेल मध्ये येताना मामांची एक चप्पल त्यात वाहून गेली. थोड्यावेळाने पाणी कमी झाल्यावर मी आणि देवेंद्र बाहेर पडलो. समोरच काठगोदाम रेल्वे स्टेशन होते. ट्रेक वरून परत आल्यावर दिल्लीला रेल्वेने जायचे ठरवले. ऑगस्ट तसा ऑफ सिझन असल्यामुळे तिकिटे ही मिळाली. परत हॉटेल वर येताना पाणी वाहायचे पूर्ण थांबले होते. अनेक लोकांच्या चपला वाहून गेल्याचे दिसत होते. मामांच्या ज्या पायाची चप्पल वाहून गेली होती, तशी दुसरी कोणाची तरी वाहून आलेली सापडली. ती घेऊन मामांना दिली आणि पुढचा प्रवास मामांनी त्याच चपलांच्या जोडावर केला!
२२ ऑगस्ट ला पहाटे लवकरच आम्ही लोहजंग ला जायला निघालो. २५० किमी चा प्रवास होता. सुरुवातीचा रस्ता चांगला होता पण जसे अल्मोडा ओलांडले तसे पूर्ण रस्ताच वाहून गेलेला दिसला व नवीन रस्त्याचे काम चालू होते. तिथे साधारण एक किमी आम्ही चालत गेलो. पुढे जसे आम्ही लोहाजंगच्या जवळ यायला लागलो, तेव्हा समजले २ ठिकाणी दरड कोसळून रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता. त्या ठिकाणी आम्ही चालत दरड ओलांडली व गाडी बदलली. असे २ वेळा करून अखेर संध्याकाळी ५ वाजता लोहाजंग ला पोहोचलो. उंची ७,५०० फूट. राजेश ची टीम १ दिवस आधीच तिथे आली होती. आमची रहायची सोय एका शाळेत केली होती. दुसऱ्या दिवशी ट्रेक सुरु होणार होता. त्या प्रमाणे सगळ्यांनी सॅक तयार करून ठेवली. थोडे नको असलेले सामान छोट्या सॅक मध्ये लोहांजंग लाच ठेवले.
| नंदा घुंटी शिखर - लोहजंग वरून |
२३ ऑगस्ट: पहाटे लवकर उठून बाहेर आलो तर समोर नंदा घुंटी शिखराने आम्हाला 'Good Morning' केले. नाश्ता करून सगळे निघायच्या तयारीत होते. राजेश म्हणाला नुकताच पावसाळा संपल्यामुळे वाटेत लिच (जळू) लागण्याची शक्यता आहे. त्याने आम्हाला मोहरीचे तेल व मीठ असे एकत्र करून पायाला लावायला सांगितले. त्याने जळू लागत नाही असे म्हणतात. आम्ही ते इतके लावले की पूर्ण अंगालाच लावायचे बाकी होते..!
आता चालायला सुरुवात करायची म्हणून मी पाठीवर सॅक घेतली व त्याचे बंद आवळले. एकच आवाज आला, बघितले तर सॅकचा एका बाजूचा बंद तुटला होता. आता काय करायचे? एकच प्रश्न! आम्ही लोहाजंग मध्ये थोडे सामान काढून ठेवायला एक छोटी सॅक आणली होती. मग काय ही बंद तुटलेली सॅक त्या बरोबर बदलली आणि ट्रेक सुरु केला.
आजचा कॅम्प होता दिदना. साधारण ९ किमी चालायचे होते. त्या मधील ६ ते ७ किमी ची पायवाट ही ठीक होता तर शेवटी २ किमी चा चढ होता. तशी ती कॅम्प साईट लोहाजंग वरून सुद्धा दिसत होती. एक डोंगर उतरायचा व दुसरा चढायचा की आले दिदना. पण ह्याच दोन डोंगरांमध्ये ती जळवा लागणारी जागा होती. पूर्ण पायवाट झाडांच्या सावलीतून होती. हिमालयातील जंगलातला एक सुगंध त्या दरी मध्ये दरवळत होता. पहिलाच दिवस असल्यामुळे चालायला खूपच उत्साह होता. जिथे जळवा लागू शकतात त्या भागात राजेशनी सर्वांना सांगितले १०-१० पावलांवर "बूट बघत रहा जळू चढत नाही आहे ना!" सगळे त्या जागेवरून जणू काही पळतच सुटले. पुढे बसायला एक मोकळी जागा केली होती. राजेश ने सर्वांना तिथे बसून जळू लागली आहे का ते बघायला करायला सांगितले. तर अर्चना, नितीन, विजय काका ह्यांना जळवांनी चांगलाच प्रसाद दिला होता. तेव्हा कळले तेल लावा नाही तर काही करा जळू ही लागणारच. पुढे २ किमी चा चढ चढून दिदनाला पोहोचलो. उंची ८,२०० फूट. खूपच मस्त कॅम्प साईट होती.
![]() |
| दिदना कॅम्प साईट |
२४ ऑगस्ट: आजचा दिवस मीनाक्षीचा होता. आज तिचा वाढदिवस होता. आजची संपूर्ण पायवाट ही दाट जंगलतुन गेली होती. एवढे दाट जंगल होते की ऊन सुद्धा नीट खालपर्यंत पोहोचत नव्हते. नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे जंगलात एक सुगंध पसरला होता, त्याच बरोबर विविध प्रकारचे मशरूम्स, शेवाळे व फुले ह्यांनी खूपच मजा आणली होती. आम्ही सगळेच फोटोग्राफी करत करत डोंगराच्या माथ्याला पोहोचलो. जरा मोकळी जागा बघून "लाडू ब्रेक" घ्यायचे ठरले.
सगळे येऊन एक तास झाला तरी ललित आणि श्रीपाद काका आले नव्हते. जंगल प्रचंड दाट होते. राजेश म्हणाला की ह्या जंगलात अस्वले व इतर प्राणी पण आहेत. तसेच कोणी हरवले तर शोधणे देखील कठीण आहे. आम्हाला काळजी वाटायला लागली. शेवटी राजेश आणि मी थोडे खाली उतरून बघून यायचे ठरवले. आम्ही १० पावले उतरलो तोच आम्हाला श्रीपाद काका दिसले. श्रीपाद काका वर आल्यावर पहिला नारळ त्यांच्यावर फुटला... त्यावर ते काही बोलेना,त्यांच्या मागोमाग ललित आला. सगळ्यांचे चेहरे बघून शांत बसला. ५ मिनिटांनी बोलला. येताना दिसलेल्या सुंदर व अनेक प्रकारच्या मशरूम्स , शेवाळे व फुले ह्यांची फोटोग्राफी करण्यात तो गुंग झाला होता आणि त्याला साथ होईल म्हणून श्रीपाद काका त्याच्या बरोबर चालत होते. पण आधी श्रीपाद काका पोहोचले, त्यामुळे नारळ त्यांच्या माथी फुटला. वातावरण निवळले.
तिथून पुढे डोंगराच्या माथ्यावर कडे कडे ने वाट होती. सगळे जण जवळ जवळ चालत होते कारण वाट पूर्ण धुक्यातून होती. एका ठिकाणी झाडे संपली आणि अचानक टेन्ट दिसायला लागलेले. आम्ही आज ६ किमी चालून अलीबुग्याल कॅम्पला पोहोचलो. उंची १०,००० फुट. संध्याकाळी ढग जरा बाजूला झाले आणि समोर मोठी दरी आणि वरून खाली असलेली गावे दिसत होती. खूपच सुंदर नजारा होता. संधीप्रकाश, थोडे ढग आणि निसर्गाने आकाशात केलेली अनेक रंगांची मनसोक्त उधळण.... अशा अत्यंत मनमोहक वातावरणात फोटोग्राफी करताना खूपच मजा आली. रात्री जेवणा आधी राजेशच्या कुकने शिऱ्याचा केक बनवला होता. मीनाक्षीचा वाढदिवस आम्ही सर्वानी १०,००० फुटांवर साजरा केला.
| अली बुग्याल एक गाव - कॅम्प साईट |
२५ ऑगस्ट: आज आम्हाला अली बुग्याल ते वेदनी बुग्याल जायचे होते. अंतर होते साधारण ७ किमी. आजची पायवाट ही पूर्ण बुग्याला (गवताचे कुरण) वरून होती. नजर जाईल तिथपर्यंत हे बुग्याल चहूबाजूनी पसरले आहे. अली बुग्याल वरून थोडे पुढे गेले की त्रिशूल आणि नंदा घुंटी हि शिखरे दिसायला सुरुवात होते पण ढग असल्यामुळे आम्हाला काहीही दिसत नव्हते. बुग्याल वरून चालायला सोपे जात होते. वेदनी बुग्याल हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे. उंची ११,००० फूट. फुलांच्या हिमालयातील खूप प्रजाती इथे उमललेल्या दिसतात. आम्हाला ही खूप फुले दिसत होती. पण ढग, हवा आणि प्रकाश अजिबातच चांगला नसल्यामुळे फोटोग्राफी म्हणावी तशी झाली नाही. थोडे फार फुलांचे फोटो काढून पुढे निघालो.
शेवटी वेदनी बुग्याल संपत आले तरी कॅम्प साईट दिसेना, बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली. तेवढ्यात एक छोटा चढ चढून गेल्यावर समोर टेन्ट दिसले. आम्ही पळत पळत टेन्ट मध्ये शिरलो. त्या दिवशी पूर्ण वेळ पाऊस चालूच होता. दुपारचे जेवण ही टेन्ट मधेच केले. आम्ही टेन्ट मधेच पत्ते खेळत बसलो. संध्याकाळी थोडा वेळ पाऊस थांबला होता, पण ढग काही आमची साथ सोडत नव्हते.
२६ ऑगस्ट: आजचा पडाव खूपच दमवणारा होता. कॅम्प साईट वरून चालायला सुरुवात केली. ढग आजही आमच्या बरोबर होते. वाट वेदनी ताल च्या कडेने वर चढत गेली होती.
थोडे पुढे चढल्यावर पाथेरनाचनी आले. आम्ही तेथील स्वछ झऱ्याचे पाणी भरून घेतले. थोड्यावेळ विश्रांती घेतली. तिथे आम्हाला हिमालयातील दाढी असेलेले गिधाड Lammergeier (Bearded vulture) दिसले. असे ऐकले की ह्याच पक्ष्याला रामायणातील जटायू म्हणतात. हवा तशी खराब होती पण तरी रेकॉर्ड शॉट काढले व पुढे निघालो. पुढे कैलूविनायकचा चढ आमची वाट बघत होता. चढ सुरु होण्याआधी मी थोडा सुकामेवा खाऊन, पाणी पिऊन तयार झालो. साधारण २ किमी चा चढ होता. त्या मध्ये आम्हाला २,५०० फूट चढायचे होते. मी वर पोहोचलो तेव्हा हवा थोडी बरी झाली होती. आधी कैलूविनायकचे दर्शन घेतले. इथपर्यंत आणल्याबद्दल आभार मानले.
"कैलूविनायक गणपतीचे देऊळ" हे जगातील सर्वात उंच ठिकाणी बांधलेले देऊळ असेल. उंची १४,५०० फूट. मी कैलूविनायक मंदिरापाशी असताना, ढगांचा पडदा बाजूला झाला आणि भव्य अशा त्रिशूल शिखराने आम्हाला थोडीशी झलक दाखवली. मी पटकन कॅमेरा घेतला आणि मंदिरावर अडकवलेल्या त्रिशुळा बरोबर हा फोटो काढला. हवा कशीही असो, निर्सग त्या मध्ये ही मजाच आणतो. मात्र फोटोग्राफरने ते क्षण टिपणे महत्वाचे असते.
जरा आराम करून पुढे चालायला सुरुवात केली तर पूर्ण रस्ता हिमालयातील ब्रम्हकमळांनी भरला होता. पायवाटेच्या दोन्ही बाजूस हिमालयातील हजारो ब्रम्हकमळे पसरली होती. साधारण २ किलोमीटरची पायवाट ही अशीच फुलांनी भरलेली होती. जणू काही आमच्यासाठीच ही पायवाट निसर्गाने सजवली होती. त्या संपूर्ण आसमंतात ब्रम्हकमळांचा मादक सुगंध पसरला होता. आमच्या मधले कोणीच हा दिवस व ही जागा विसरू शकत नाही.
आमचे नशीब चांगले होते, अजून पाऊस सुरु झाला नव्हता. त्यामुळे मनसोक्त फोटोग्राफी करता आली. अशी साधारण २किमी ची पायवाट चालून गेल्यावर भगुवाबासा आले. उंची १४,००० फूट. आमचे टेन्ट लागलेले दिसले, तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने राहण्यासाठी डोम आकाराचे पत्र्याचे घर बनवले होते. त्या मध्ये आमचे स्वयंपाक घर सेट केले होते. आता जोरदार वारा सुटला होता आणि दरीतून भराभर ढग वर येत होते. आम्ही जेवण करून सकाळी तरी छान हवा मिळावी ह्या इच्छेने टेन्ट मध्ये गुडूप झालो. रात्री तर फारच मोठे वादळ झाले. पोर्टर टेन्ट पाशी आले, त्यांनी टेन्टच्या outer वर मोठमोठे दगड ठेवले आणि म्हणाले "संभल के रहना, हवा जोर सी चल रही हैं! टेन्ट उड के भी जा सकता हैं!". मग काय! असे ऐकल्यावर कसली झोप लागतीये! उगीच मनात विचार यायला लागले उडत्या टेन्ट मध्ये झोपलो आहोत असे.
| कॅम्प भगुवाबासा उंची १४,००० फूट - शिखर त्रिशूळ - उंची २३,००० फूट |
२७ ऑगस्ट: पहाटे साधारण ४.३० वाजता बाहेर आलो. तापमान साधारण -२॰ असेल. स्वछ हवा, समोर दिमाखात उभी असलेली त्रिशूल व नंदा घुंटी शिखरे आणि दरी मध्ये ढगांची पसरलेली गादी अशा नयनरम्य दृश्याने दिवसाची प्रसन्न सुरुवात झाली. ह्यालाच बहुधा स्वर्ग म्हणत असावेत..! आम्ही फोटोग्राफी करण्यात रममाण झालो होतो.
![]() |
| कॅम्प भगुवाबासा उंची १४,००० फूट - शिखर नंदा घुंटी - उंची २०,७०० फूट |
राजेश ने आठवण केली, पुढे रुपकुंड वाट बघत आहे. आम्ही चहा-बिस्कीट घेतले, आवरले व बरोबर थोडा सुकामेवा आणि पौष्टिक लाडू घेऊन चालायला सुरुवात केली. समोर २५०० फुटांचा खडा डोंगर व वळणा-वळणाची पायवाट होती. चांगलाच दमवणारा चढ होता. प्रत्येक वळणावर असे वाटत होते की आता वर आलो, पण ते सर्व मृगजळा सारखे होते. आता तर हवा पण छान होती. इतक्या दिवसात आज आम्ही खूप वेळ उन्हात चालत होतो. मी श्वासोछ्वासाची लय पकडून जप करत चालत होतो. त्यामुळे चढायला जरा सोपे जात होते. वर पोहोचत आल्यावर मंदिरासारखे काही तरी दिसले व त्या शेजारी श्रीपाद काका उभे होते. वरून आवाज देत होते "आलेच आहे या लवकर!" मी वर पोहोचलो तर मंदिरा मागे रुपकुंड दिसले. उंची १६,४७० फूट. प्रचंड आनंद झाला होता. थोडे अजून पुढे जाऊन नीट बघितल्या वर कळले त्या मंदिरा समोर कवट्या आणि हाडे ठेवली होती आणि तलावा मध्ये असंख्य मानवी हाडे विखुरलेली होती. वर्षातील साधारण ११ महिने हा तलाव बर्फात असतो. त्यामुळे ही सर्व हाडे बर्फात गाडलेली असतात. आम्ही मुद्दामून ऑगस्ट महिना निवडला होता. पूर्ण बर्फ वितळून गेला होता आणि त्याचमुळे आम्हाला ही असंख्य मानवी हाडे दिसत होती.
हळू हळू करत आमची पूर्ण १३ जणांची टीम रुपकुंड ला पोहोचली. सर्वांनी तिथल्या ९ व्या शतकातल्या लोकांसोबत group फोटो काढला. पौष्टिक लाडू खाऊन उतरायला सुरुवात केली. आता मात्र खाली दरीत असलेले गादी सारखे ढग वर यायला सुरुवात झाली होती. आम्ही पळतच खाली उतरायला लागलो. परत भगुवाबासाला आलो. राजेश ची टीम पुढे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली होती आणि आमच्या साठी १४,००० फुटांवर पास्ता करून ठेवला होता. तो खाऊन आम्ही सुद्धा खाली उतरायला सुरु केले. परत त्या हिमालयातील ब्रम्हकमळाच्या पायवाटेवरून निघालो. कैलूविनायकाचे दर्शन घेतले. सर्वांचा ट्रेक यशस्वी झाल्या बद्दल बाप्पाला एक ब्रम्हकमळ वाहिले, नमस्कार केला आणि उतरायला लागलो. उतार संपला आणि हळू हळू पाऊस सुरु झाला. आम्ही पॉन्चो (बरसाती) घालून चालायला लागलो. पाथेरनाचनी आले. उंची होती १२,००० फूट. पण आमचा कॅम्प अजून पुढे लावला होता. कमरे एवढ्या गवतातून पायवाट गेली होती. कसे बसे कॅम्प साईटला पोहोचलो. पाऊस काही थांबायचे नावच घेत नव्हता. आम्ही आज रुपकुंड करून ३,५०० फूट खाली उतरलो होतो. पावसामुळे पोहोचायला उशीर झाला होता. आम्ही दुपारचे जेवण ४ वाजता टेन्ट मधेच केले. संध्याकाळी थोड्यावेळ पाऊस थांबला होता. आम्ही टेन्ट मधून बाहेर आलो. सगळ्यांबरोबर आजच्या दिवसाच्या आठवणी share केल्या. रात्री परत पाऊस सुरु झाला. आम्ही सगळे टेन्ट मध्ये पत्ते खेळत बसलो आणि परत टेन्ट मध्येच जेवण करून झोपलो. रात्री पावसाने जोर धरला होता. त्याच बरोबर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट! आम्ही ट्रेक यशस्वी झाल्यामुळे खुश होतो आणि दमलोही होतो, त्यामुळे झोप कधी लागली कळलेच नाही. पण अचानक उरात धडकी भरवणारा प्रचंड मोठा आवाज झाला आणि सगळेच झोपेतून जागे झालो. एका क्षणासाठी केदारनाथ ची पुनरावृत्ती इथेही झाली की काय असा भयानक विचार मनात येऊन गेला.... आम्हीच काय पण तिथले लोकल पोर्टर देखील घाबरले होते... सुदैवाने असे काही घडले नव्हते. तो ढगांचाच गडगडाट होता. तो थरार पुढे रात्रभर कमीजास्त प्रमाणात सुरूच राहिला.
२८ ऑगस्ट: सकाळी नशिबाने पाऊस थांबला होता. वातावरण स्वच्छ व्हायला सुरुवात झाली होती. आम्ही निवांत नाश्ता करून निघालो. आज परत वेदनी बुग्यालला जायचे होते. कालच्या पावसामुळे टेन्ट, outer सगळे खूपच भिजले होते. आमच्या पोर्टरने लवकर वेदनी बुग्यालला पोहोचून तिथले फॉरेस्ट डिपार्टमेंटनेचे डोम आकाराचे पत्र्याचे घर मिळवले. आम्ही सगळे जण निवांत फोटोग्राफी करत वेदनी बुग्यालला पोहोचलो. सोबत ढग होतेच, पण आम्हाला चिंता नव्हती, कारण आज आम्ही घरात राहणार होतो.
| वेदनी बुग्याल मधील सकाळ |
२९ ऑगस्ट: पहाटे उठून बाहेर येऊन पहिले तर आकाशात ढगांनी आपला खेळ मांडला होता. प्रत्येक डोंगरावर निरनिराळ्या पद्धतीने ढग पसरले होते. ते दृश्य इतके जादुई होते की आम्ही डब्याला सुद्धा कॅमेरा घेऊन गेलो. माझ्या आयुष्यातील ही अजून एक अविस्मरणीय सकाळ होती. त्या दिवशी मी खूप फोटोग्राफी केली.
| वेदनी बुग्याल मधील सकाळ |
नाश्ता करून निघालो अलीबुग्याल ओलांडून आज आम्हाला दिदनाला पोहोचायचे होते. साधारण १४ किमी चे चालणे होते. पण सगळाच उतार असल्याने चालणे सोपे जात होते. अलीबुग्याल ओलांडून दिदनाला जायचा उतार सुरु झाला. मी, ललित आणि मामा परत तीच विविध प्रकारची मशरूम, शेवाळी व फुलांची फोटोग्राफी करत उतरत होतो. खरेच निसर्ग हा एक उत्कृष्ट कलाकार आहे, हे इथे कळून येते. एवढा मोठा ट्रेक झाल्याने सगळ्यांचे पाय तयार झाले होते. राजेश तर पळत सुटला होता, ते बघून देवेंद्र पण त्यांच्या मागे पळत गेला. एका ठिकाणी तो चक्क कोलांटीउडी मारून आडवाच झाला. आम्ही सगळे जोरात ओरडलो "देवेंद्र..!" नशिबाने त्याला काही जास्त लागले नव्हते. पडताना त्याने स्वतःला बरेच सावरले होते. दिदनाला पोहोचलो. पहिल्या दिवशी जिथे थंडी वाजली होती तिथे आता वरून आल्यामुळे चक्क आम्हाला उकडायला लागले होते.
३० ऑगस्ट: सकाळी उठलो, बाहेर आलो आणि समोर लोहाजंग गाव दिसले. खरे सांगायचे तर अजिबात जायची इच्छा नव्हती. ७ दिवस आम्ही एका सुंदर विश्वात होतो. असे वाटत होते एक वेगळेच आयुष्य जगून आलो आहोत. नाश्ता करून चालायला सुरुवात केली. दिदना उतरलो. जळवांचा भाग ओलांडला आणि लोहाजंग च्या वाटेवर जाण्याऐवजी आम्ही कुलिंग गावाचा चढ सुरु झाला. राजेश ने सांगितले लोहाजंग पेक्षा कुलिंगचे अंतर कमी आहे. पण चढ जास्त आहे हे सांगायचे तो विसरला. असा चढ होता की परत कैलुविनायक आठवले. थोडे वर आल्यावर घरे दिसायला लागली. आम्ही पुढे जाऊन थांबलो होतो तेव्हा वरून एक म्हैस पळत जाताना दिसली आणि आता खालून येणाऱ्या आणि दमलेल्या लोकांची धमाल मजा ऐकायला मिळणार हे आमच्या लक्षात आले. अर्चना आणि विजय काका एकत्र चालत होते. एका वळणावर त्यांच्या पुढे ही म्हैस पळत येताना दिसली. तो चढ चढताना ते दोघे इतके दमले होते, की त्या म्हशीपुढे ते हताश झाले. अर्चनाची तर चांगलीच घाबरगुंडी उडाली..... पण म्हैस शाहण्यासारखी एका बाजूने पळून गेली. आम्ही सगळे वर पोहोचलो. राजेशने तिथे २ जीप बोलावून ठेवल्या होत्या. कुलिंगचा चढ चढून आल्यावर जेव्हा गाड्या दिसल्या तेव्हा यालाच "सुख" म्हणतात असेच सगळ्यांना वाटले! जीपने आम्ही लोहाजंगला पोहोचलो.
तिथे आठ दिवसांनी सगळ्यांनी तिथे गार पाण्याने अंघोळ केली. सगळे ट्रेक च्या गप्पा मारण्यात रममाण झाले होते. आम्ही संध्याकाळी लोहाजंग गाव फिरून आलो. तेथील गावकऱ्याना आश्चर्य वाटत होते, कारण जून मध्ये एवढी हानी होऊन सुद्धा आम्ही ट्रेक करायला आलो होतो. तसे त्यांनी आम्हाला बोलूनही दाखवले. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु केला.
| रुपकुंड टीम @ १६,४७० फूट |
३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: पहाटे लोहाजंग वरून नंदाघुंटी शिखर खूपच छान दिसत होते. समोर दिदनाचा कॅम्प पण दिसत होता. आम्ही फोटोग्राफी करत असताना राजेश म्हणाला ट्रेक संपला पण तुमची फोटोग्राफी काही संपली नाही. मी त्याला म्हणालो "निसर्गात सुदंरता ही सगळी कडेच दिसत असते. योग्य वेळेस व योग्य पद्धतीने जो हि सुंदरता कॅमेऱ्या मध्ये कैद करतो त्याला फोटोग्राफर म्हणतात."
| नंदा घुंटी शिखर व दिदना कॅम्प साईट - लोहजंग वरून |
त्यानंतर नाश्ता करून आम्ही निघालो. राजेशने आमच्या साठी रुपकुंड ट्रॅव्हल्स कडून गाड्या बोलावल्या होत्या. रस्ता खराब असल्यामुळे दोन सुमो आल्या होत्या. परत तसेच दोन दरड ओलांडून जावे लागणार होते. पण निघालो तेव्हा कळले कि एका ठिकाणची दरड पूर्णपणे काढून रस्ता बनवला आहे. खराब रस्ता संपवून चांगल्या रस्त्याला आल्यावर देवल गावात आम्ही रुपकुंड ट्रॅव्हलच्या मालकाला भेटलो. ते आम्हाला बघून खूपच खुश झाले. म्हणाले जून नंतर तुम्ही पहिले टूरिस्ट आहात जे आमच्या इथे आलात. खरेच पूर्ण उत्तराखंडावर त्या प्रलयाचा खूपच मोठा परिणाम झाला होता.
उत्तराखंडातील या सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही येताना ४ दिवस राखीव ठेवले होते. पण सर्वकाही वेळेत झाल्यामुळे आणि सगळेच एकदम फिट असल्यामुळे, आम्ही बागेश्वर, जागेश्वर, पाताळ भुवनेश्वर, बैजनाथ, नैनिताल अशी एक मस्त ट्रिप करायची ठरवली. आम्ही १३ जण होतो, त्यामुळे एक १४ सीटर Tempo Traveler बुक केली. सर्व ठिकाणी KMVN च्या गेस्ट हाऊस मध्ये रहात होतो. एक तर ऑफ सिझन आणि त्यातून जून मध्ये झालेली हानी त्यामुळे कुठेही वर्दळ तर नव्हतीच, पण जिथे जाऊ तिथले लोक आमचे आनंदाने स्वागत करत होते. जसे ठरवले होते तसे सर्व काही बघून झाले, खूप फोटोग्राफी पण झाली आणि शेवटी गाडीने आम्हाला काठगोदामला सोडले. आमची रात्रीची दिल्लीला जायची रेल्वे होती रानीखेत एक्सप्रेस. आम्ही प्लॅटफॉर्म वरच बसून रात्री १० वाजता रेल्वे पकडली. म्हणजे ट्रेक तर उत्तम झालाच पण त्या बरोबर एक मस्त ट्रिप पण झाली. ह्या ट्रिपचे काही निवडक फोटो.
५, ६ सप्टेंबर: ५ तारखेला पहाटे ४.३० वाजता रेल्वे पुरानी दिल्ली स्टेशनला आली. आम्ही उतरलो आणि जीपने निजामुद्दीन स्टेशनला गेलो. परत पुणे - दिल्ली दुरान्तो एक्सप्रेस ने पुण्याचा प्रवास सुरु केला. ६ तारखेला सर्व जण सुखरूप पुण्याला पोहोचलो.




सगळा ट्रेक डोळ्यांसमोर उभा राहिला.
ReplyDeleteधन्यवाद...!
DeleteAmazing experience .... Thanks amod for giving me such a wonderful nature experience...... Thevadha snow padala asata tr bara zala asata😅😂
ReplyDeleteThanks..!
Deleteजबरदस्त
ReplyDeleteधन्यवाद...!
DeleteKamaal lihile aahes,Trek chya saglya athavani jagya jhalya.
ReplyDeleteधन्यवाद...!
DeleteMasta, Himalayan experience.
ReplyDeleteधन्यवाद...!
Deletetrishul photos ani baki photos beautiful ani likhan pan mast
ReplyDeleteधन्यवाद...!
Deleteevergreen scenic Himalayas, Photos and blog beautiful
ReplyDeleteThanks..!
Deleteसर्व फोटोज अफलातून आले आहेत.... एकंदरीत सर्वच उत्तम!
ReplyDeleteअप्रतिम ट्रेक आहे. प्रत्येकाने करायलाच हवा असा.
ReplyDeleteआम्ही ढगफुटीच्या आधल्या दिवशी म्हणजे 15 जून 2013 ला रूपकुंड ट्रेक संपवून वाणमार्गे लोहाजंगला मुक्कामी होतो. त्याच रात्री ढगफुटी झाली. आम्हाला अर्थातच माहीत नव्हते. मुसळधार पावसातच पहाटे पाचला निघून काठगोदाम पर्यंतचा प्रवास ट्रेकसारखाच रोमांचक होता... जिवंत आलो हेच महत्त्वाचे ठरले एवढेच...
धन्यवाद...! हो तुमचा ट्रेक खर तर ट्रेक संपल्या वर झाला :)
DeleteExcellent description and photos! I would have liked to see more photos of Roopkund and the skeletons. I am sure you must have read various theories of how the skeletons came to be there. After reading your description of chappals being washed away in the rain, I recollected one theory proposed by the researchers at Deccan College, Pune. They said is that the skeletons belong to pilgrims from Sangli- Kolhapur area. They have found some pieces of ornaments and chappals akin to this area of Maharashtra. DNA analysis was also done on the bones fund here, which supports this theory. Incidentally the famous National Geographic documentary as made by the
ReplyDeleteDeccan College team, but because of copyright issue their names are not seen in the documentary.
Thank you kaka..! Yes I have read all theories related to Roopkund and also watched various documentaries of Roopkund mystery..! Yes also heard about Maharashtrian DNA story.
DeleteSorry for the typos!
ReplyDeleteखूप छान! पूर्ण ब्लॉग वाचला , थोडा वेळ विसरले कि मी घरीच बसुन हा ब्लॉग वाचत आहे . सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या अणि परत एकदा जावे का रूप कुंड ला अशी इच्छा झाली , खरच या आठवणी न विसरणार्या आहेत , या ट्रेक बद्द्ल लिहावे तेवढे कमी आहे. Unforgettable 17 days of our life.
ReplyDelete