जून २००३
ट्रेक टीम: चंद्रशेखर बापट (मामा), योगेश राजगुरू, संदीप परांजपे आणि मी.
ट्रेक रूट: गंगोत्री - भोज खडक - केदार खडक - केदार ताल - भोज खडक - गंगोत्री
केदार ताल उंची १६,६५० फूट, केदार ताल चा जन्म हा भृगुपंथ व थलाईसागर तसेच आजूबाजूच्या शिखरांवरून येणाऱ्या बर्फाच्या पाण्याने झाला आहे. त्याची लांबी २.५ किमी आहे. त्यातूनच केदार गंगेचा उगम झाला आहे. गंगोत्री मध्ये भागीरथी नदीला मिळणारी शंकराची पहिली नदी म्हणून केदार गंगा ओळखली जाते. केदार ताल ट्रेक हा गंगोत्री भागातील सर्वात कठीण ट्रेक. अतिशय अरुंद दरी व त्यामधून वाहणारी केदार गंगा. ट्रेकिंग चा मार्ग अतिशय कठीण व खडी चढण असलेला. तर काही ठिकाणी खूप सांभाळून चालावे लागेल असा. भुसभुशीत रेती मुळे सतत दगड सुटून लागण्याची शक्यता.
पहिला दिवस: आम्ही गंगोत्री भागातील डोड्डीताल व रुदूगैरा बेस कॅम्प ट्रेक करून परत गंगोत्री मध्ये आलो. त्यामुळे पूर्ण acclimatization झाले होते. ट्रेक सुरु करायच्या आदल्या दिवशी आमचा गाईड 'राणा' म्हणाला केदार तालचा ट्रेक ह्या भागातील सगळ्यात कठीण ट्रेक आहे. खूपच खडी चढण, बर्फाचे नाले, पूर्ण रेती असलेला डोंगर अश्या अनेक आव्हानांना तोंड देत जायचे होते. आम्ही ट्रेक ला जायच्या आधी घरी फोन केला "उद्या ट्रेक सुरू होत आहे. चार दिवसांनी आलो की ("मनात म्हणालो आलो तर") फोन करतो!"
ट्रेक सुरु झाला,भागीरथी ओलांडून केदार गंगेच्या दरीत शिरलो. लगेचच समोर मोठा डोंगर चढून जायचे होते. साधारण ५०० ते ६०० फुटाचा डोंगर असेल. वर पोहोचलो, जरा सरळ पायवाट होती. शेजारी खूपच अरुंद व खोल दरी होती. थोडे पुढे गेलो तर जोरदार पाण्याचा आवाज येत होता, पण पाणी कुठेच दिसत नव्हते. एका ठिकाणा वरून खाली बघितले तर, प्रचंड खोल १,००० फुटांचा ड्रॉप होता आणि त्या मध्ये केदार गंगा वाहत होती. तो पट्टा चढून पुढे गेल्या वर, एक खूपच अरुंद पायवाट सुरु झाली. पुढचा सगळा ट्रेक हा अश्याच पायवाटेवरून होता. चुकून पाय सटकला तर, ४00 ते ५00 फूट खाली केदार गंगे मध्ये आणि लगेच वरती सुद्धा! अश्या पायवाटेवर एकापाठोपाठ एक असेच चालावे लागते, ते सुद्धा एकमेकांच्यात अंतर ठेवून. आज आम्ही ८ किमी चालून भोज खडक कॅम्प साईट ला पोहोचलो. उंची होती १२,८०० फूट. आम्ही ट्रेकिंग साठी टेन्ट आणि शिधा पुण्यावरून नेला होता. टेन्ट मामांनी घरी शिवले होते. त्यामुळे गंगोत्री मध्ये आल्यावरआम्हाला फक्त गाईड व पोर्टर घ्यावे लागले. आमच्या पोर्टर ना टेन्ट कसे उभारायचे माहित नव्हते. त्यामुळे आम्हीच ते उभारले. वातावरण स्वछ होते. तिथे एक पडकी पत्र्याची शेड होती त्यामध्ये किचन सेट केले. चहा बनवला. मस्त वातावरण, थंडगार हवा आणि केदार गंगेचा आवाज ह्या मध्ये चहा पिण्याची मजा काही औरच. राणा ने सांगितले उद्याचा दिवस कमी चालायचे आहे पण पायवाट जास्त कठीण आहे. आम्ही त्याने सांगितल्या प्रमाणे मनाची तयारी केली. बाकी दिवस आराम केला.
| भोज खडक कॅम्प साईट |
दुसरा दिवस: पहाटेच जाग आली. चहा, नाश्ता करून चालणे सुरू केले. आज ४ किमी चालायचे होते. थोडे पुढे गेल्यावर थलाईसागर शिखर डोकावले. वा वा..! ते बघून आमच्या चालण्यात अजून जोश आला. आता सागाची झाडे सुरु झाली होती. एका ठिकाणी सागाचे झाड व थलाईसागर खूपच सुंदर दिसत होते आम्ही थांबून फोटो काढला.
हे डिजिटल कॅमेऱ्याचे युग त्या वेळेस नव्हते. आमच्या सगळ्यांकडे Film SLR कॅमेरे होते. त्यामुळे मोजून फोटो काढले जात होते. उगीचच वाटेल तिथे क्लिक केले जात नव्हते. पुण्यावरून निघतानाच रोल किती घ्यायचे हे ठरलेले असायचे, त्या वर फोटो किती निघणार हा अंदाज पण होता. माझ्या कडे तेव्हा Nikon FM १० हा कॅमेरा होता.
आम्ही तेथून पुढे निघालो. आता आम्ही साधारण १३,५०० फुटांवर पोहोचलो होतो. एका ठिकाणी राणा ने थांबवले व म्हणाला "थोड्यावेळ इथे विश्रांती घ्या, थोडा सुकामेवा खाऊन, पाणी पिऊन घ्या!" आम्हाला कळेना असे का म्हणत आहे. विचारले तर त्याने सांगितले पुढे फक्त रेती (स्क्रि) असलेला असा १.५ किमी चा पट्टा आहे त्या मध्ये तुम्हाला थांबता येणार नाही उलट पळावे लागेल. कारण पूर्ण डोंगर रेती (स्क्रि) असल्यामुळे वाऱ्याने सतत छोटे मोठे दगड वरून निसटत असतात ते तुम्हाला लागू शकतात. थोडा आराम केल्यावर चालायला सुरुवात केली. जसे जसे पुढे जात होतो तसे कळत होते की त्या रेती वर पाय ही नीट ठेवता येत नाही आहे. पळावेच लागत होते. पुढे पायवाटेवर मोठा दगड पडला होता. माझ्या पुढे मामा होते. त्यांना वाटले त्यावर पाय ठेवून गेलो म्हणजे नीट जाता येईल. पण कसले काय! त्यांनी त्या वर पाय ठेवला आणि तो दगड निसटून थेट केदार गंगेत गेला. नशिबाने मामांनी लगेच दुसरे पाऊल पुढे टाकले आणि तोल सांभाळला. ते बघून मी जास्तच सांभाळून पावले टाकत होतो. आता तो पट्टा संपत आला होता. दगड पडत असल्यामुळे आम्ही आमच्या मध्ये खूप अंतर ठेवून चालत होतो. मामा, मी आणि योग्या तो पट्टा क्रॉस करून पलीकडे पोहोचलो. संदीप आणि राणा येताना दिसत होते.तेवढ्यात राणा संदीप ला ओरडला "जल्दी भागो!" आणि त्याला जोरात पुढे ढकलले. बघितले तर वरून एक दगड येऊन संदीप ला लागणार तेव्हढ्यात राणाने संदीपला ढकलले त्यामुळे तो दगड संदीपला न लागता राणाच्या पायावर लागला. ते दोघे पोहोचल्यावर आधी राणाने बूट काढले बघितले तर घोट्या पाशी त्याचा पाय चांगलाच सुजला होता. माझ्या कडे Volini व क्रेप बँडेज होते. ते त्याला पायाला लावायला दिले. थोड्या वेळ आम्ही तिथेच बसून होतो. पुढे थोड्याच अंतरावर आम्ही केदार खडक कॅम्प साईट वर पोहोचलो. उंची १५,००० फूट. कॅम्प साईट वरून थलाईसागर व भृगुपंथ शिखरे खूपच सुंदर दिसत होती. त्या संध्याकाळी तिथे असलेल्या मोठ्या दगडावर बसून मामांनी बासरी वाजवली. अत्यंत सुरेल संध्याकाळ होती ती! रात्री प्रचंड थंडी होती. आमच्या पोर्टरने सकाळी चहा साठीचे पाणी भरून ठेवले. ते रात्रीच गोठले. बघितले तर बाहेर -१३ तापमान होते आणि टेन्ट मध्ये -५ तापमान होते. झोप कोणालाच नीट लागली नाही.
![]() |
| भृगुपंथ व थलाईसागर शिखर, केदार खडक कॅम्प साईट वरून. |
तिसरा दिवस: एक सोनेरी पहाट, सूर्याच्या किरणांनी थलाईसागर शिखर लखलखत होते. भरपूर फोटोग्राफी केली. आवरले, नाश्ता केला आणि पाणी, सुकामेवा घेऊन निघालो. आज आम्हाला केदार तालला पोहोचण्या साठी ५ किमी चालायचे होते. जसे जसे पुढे जात होतो तसे थलाईसागर, भृगुपंथ शिखरे जवळ जवळ येत गेली. शेवटी एक मोठे मोरेन चढून वर आलो आणि विराट अश्या केदार ताल (उंची १६,६५० फूट) व त्याच बरोबर सुंदर पण अजस्त्र अश्या थलाईसागर (२२,६५१ फूट) व भृगुपंथ (२२,२१८ फूट) शिखरांचे पूर्ण दर्शन झाले. मन प्रसन्न झाले. भृगुपंथ शिखरा बद्दल अशी आख्यायिका आहे की ब्रूघुऋषी ह्या वरून स्वर्गात गेले! थलाईसागर शिखराची सुंदरता ही त्या मध्ये असलेल्या लाल रंगाच्या खडकाची आहे, ज्या वर बर्फ टिकून रहात नाही त्यामुळे दगडाचा रंग आपल्याला दिसत राहतो! खूपच भव्य आणि सुंदर नजारा होता.
वरून थोडे फोटो काढून. छोट्या पायवाटेने आम्ही केदार तालच्या किनाऱ्या पाशी गेलो. तिथे एक शंकराचे मंदिर केले होते. तिथे आम्ही पूजा केली. आमचा ट्रेक यशस्वी केल्या बद्दल आभार मानले. तिथून थोडे फोटो काढले. आणि परतीचा प्रवास सुरु केला. येताना परत त्या मोरेन वरून उतरून यायचे होते. सगळा बर्फच असल्याने आम्ही त्या बर्फावरून घसरून खाली उतरलो. मस्त गप्पा मारत चाललो होतो. वातावरण खूपच छान होते. राणा म्हणाला, "सगळ्यांना असे वातावरण मिळत नाही तुम्ही खूपच नशीबवान आहात."
तेवढ्यात मामांना थलाईसागर शिखरा मागून एक मोठा ढग येताना दिसला. जसे जसे आमची कॅम्प साईट जवळ येत होती तसे तसे तो प्रचंड मोठा ढग ही आमच्या दिशेने येत होता. आम्ही कॅम्प साईटला पोहोचे पर्यंत तो आमच्या कॅम्प साईट वर आला होता. मामा म्हणाले हा Cumulonimbus प्रकारचा ढग आहे. ह्या उंची वर हा ढग बर्फच पाडेल. आम्ही ठरवले आजच भोज खडक ला जाऊया. भराभर टेन्ट आवारले किचन आवरले. पोर्टरला किचनच्या इथे दगडांमध्ये लपवलेला रसगुल्ल्याचा डबा सापडला. आम्ही ते खाऊन ट्रेकचे यश साजरे केले आणि निघालो. थोड्याच वेळात परत ती रेती (स्क्रि) असलेला पट्टा आला. बघितले तर ढग आणि वाऱ्यामुळे त्या भागात धुळीचे वादळ निर्माण झाले होते. आज १० किमी च्या वर चालून आल्यामुळे पायात चांगलीच ताकद आली होती. तो पूर्ण पट्टा आम्ही सगळे पळत गेलो. या वेळेस नशिबाने कोणाला काही झाले नाही. आमचे पोर्टर तर आमच्या ही पुढे पूर्ण रस्ता पळतच होते. जस जशी भोज खडक कॅम्प साईट जवळ येत होती तसे आकाश ढगांनी पूर्ण भरत आले होते. आता आम्ही सगळे पळून थकलो होतो. कॅम्प साईट पायवाटे वरून दिसायला लागली. बघितले तर पोर्टर टेन्ट लावायचा प्रयत्न करत होते. ते मामांनी शिवलेले टेन्ट होते. त्यांना लावता येणे शक्य नव्हते. मी जिथे होतो तिथे माझी सॅक काढून ठेवली आणि पळत सुटलो. आधी कॅम्प साईट वर पोहोचून त्यांच्या मदतीने टेन्ट उभे केले. मामा, योग्या, संदीप माझी सॅक घेऊन आले. आम्ही सगळे टेन्ट मध्ये शिरलो आणि बर्फ पडायला सुरुवात झाली. साधारण अर्धा तास बर्फ पडत होता. टेन्ट च्या बाहेर साधारण १ इंच बर्फ साठला होता. बर्फ पडायचा थांबल्या वर आम्ही बाहेर आलो आणि आज इथे यायच्या निर्णया बद्दल मामांचे आभार मानले. राणा पण म्हणाला "खरेच बरे झाले इथे आलो." भोज खडकाची उंची १२,८०० फूट असून तिथे एवढा बर्फ पडला तर केदार खडक कॅम्प साईट उंची १५,००० फूट तिथे काय झाले असेल कल्पना पण करवत नाही. बर्फ पडलेल्या त्या मस्त वातावरणात चहा प्यायला आणि जेवायला बटाट्याचा खिस, सूप व खिचडी केली. त्या थंडीत गरमा गरम सूप आणि खिचडी खाताना फारच मजा आली.
चौथा दिवस: काल खूपच दमछाक झाल्या मुळे आज आम्ही निवांत निघायचे ठरवले होते. आम्ही नाश्ता करून साधारण ७.३० वाजता निघालो. कॅम्प साईट वरून वर चढून मुख्य पायवाटेवर आलो आणि लगेचच एक बर्फाचा नाला ओलांडायचा होता. साधारण २० फुट लांबीचा नाला असेल. पोर्टर म्हणाले कॅम्प साईट वर वापरायचे पाणी आम्ही इथूनच आणत होतो. असे म्हणून त्यांनी तो नाला ओलांडायला सुरु केले. पण काल झालेल्या बर्फवृष्टी मुळे आणि तापमान एकदमच निचांकी झाल्यामुळे तिथला बर्फ खूपच कठीण झाला होता. राणा आणि पोर्टर १० -१५ मिनिटे त्या बर्फावर टोकदार काठ्या मारून पायऱ्या करायचा प्रयत्न करत होते. पण त्यांचे पाय सटकतच होते. आम्ही तर प्रयत्न ही केला नाही. शेवटी दोन्ही पोर्टर मित्रांनी जे काही केले, ते दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही. पोर्टर लोकांनी बूट काढले आणि अनवाणी पायांनी तो बर्फाचा नाला ओलांडला! त्यांचा विचार बरोबर होता, पायच्या उष्णते ने तो बर्फ वितळला आणि त्यांचे पाय व्यवस्थित बसायला लागले. हे सगळे काही आम्ही २ ते ३ लेअर कपडे, हातमोजे, कानटोपी घालून बघत बसलो होतो. पोर्टर लोकांनी तशी २ वेळा ये-जा केली व आमच्या सगळ्यांचे सामान पलीकडे नेऊन ठेवले. राणा म्हणाला "आता मी जाऊन बघतो." त्याला व्यवस्थित पलीकडे जाता आले. तो परत मध्य भागी येऊन थांबला आणि आम्हाला यायला सांगितले पहिले संदीप गेला, त्यांच्या मागे मामा, त्या मागे योग्या व शेवटी मी होतो. आम्ही सगळे एका पाठोपाठ एक नाल्यावर उभे होतो आणि संदीप नाल्याच्या मध्य भागी अडकला, तिथून पुढे जाताना त्याचा पाय सटकायला लागला. काही केल्या त्याला पुढे जाता येईना. आता आम्ही सगळे जण त्या बर्फाच्या नाल्यावर अडकलो होतो. थोडे जरी हललो तरी पाय सटकत होते. मागे जायचे म्हणले तरी पाय सटकत होते. मी तर फक्त रडायचा बाकी होतो. एकाचा जरी पाय सटकला असता तर डायरेक्ट खाली केदार गंगा आणि २ मिनिटात गंगोत्री... पण जिवंत नाही. मामांनी वर डोगंरावर बघितले तर सूर्य किरणे आमच्या पासून ५ ते ६ फुट लांबवर होते. मामा म्हणाले आपण अजून १५ ते २० मिनिटे असेच थांबूया. ऊन आले कि बर्फ वितळेल आणि आपल्याला सहज जाता येईल. आम्ही सगळेच जप करत त्या जागी साधारण २० मिनिटे थांबलो. ऊन आल्या आल्या लगेच बर्फात बूट बसायला लागले व आम्ही खूपच सहज तो बर्फाचा नाला ओलांडला. सगळ्यांनी हुश्श केले. बघितले तर सगळ्यांचे हातमोजे जळले होते. तिथे उभे असताना आम्ही बर्फाला आधार म्हणून पकडले होते आणि हातात हातमोजे होते. थोड्या वेळ शांतपणे तिथेच थांबलो, सॅक अडकवली आणि पुढे जायला निघालो. दुपारी जेवायला गंगोत्री मध्ये पोहोचलो. आम्ही राणा व त्यांच्या टीम वर खूपच खुश होतो. त्यांना खूप खूप धन्यवाद दिले आणि बक्षीसी दिली.
ह्या वर्षी आम्ही गंगोत्री भागातील ३ ट्रेक केले. डोड्डीताल, रुदूगैरा बेस कॅम्प आणि केदार ताल. हे तिन्ही ट्रेक आमच्या टीम मधले मी आणि मामाच पूर्ण करू शकलो. त्यातून केदार ताल झाला त्यामुळे आम्ही खूपच खुष होतो. आधी घरी फोन करून ट्रेक यशस्वी झाल्याचे व सर्वजण सुखरूप गंगोत्रीला आल्याचे कळवले.
| टीम केदार ताल |
परतीचा प्रवास: आलो त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी आम्ही उत्तरकाशीला गेलो. तिथे काशीविश्वेश्वराच्या देवळात जाऊन आलो. सगळे ट्रेक यशस्वी केल्या बद्दल आभार मानले. तिथून आम्ही ऋषिकेशला आलॊ. त्रिवेणी घाटावर गंगा आरती केली. दुसऱ्या दिवशी दिल्ली ला येऊन. निजामुद्दीन - गोवा एक्सप्रेस नी पुण्याला आलो. सर्वजण सुखरूप पुण्याला पोहोचलो.



कमाल....!
ReplyDeleteधन्यवाद...!
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमस्त, सुंदर वर्णन
ReplyDeleteधन्यवाद...!
Deleteरोमहर्षक ट्रेक!
ReplyDeleteछान वर्णन !
रेतीचा रस्ता, केदार गंगा डोळ्यांपुढे येत सगळं.
बर्फाचा नाला ओलांडण्याचा थरार ट्रेकमध्ये अनपेक्षित गोष्टींना कसे सामोरे जावे हे जाणवून देते !
Thanks a lot..!
Deletewow great thrilling expeirence Amod!
ReplyDeleteThank you Ira..!
Delete